Year Ender 2025  Pudhari
Travel

Year Ender 2025: जगभरात सर्वाधिक सर्च झालेलं भारतीय शहर कोणतं? जाणून घ्या टॉप सर्च डेस्टिनेशन्स

Year Ender 2025: गुगलच्या Year Ender 2025 यादीत प्रयागराज हे जगातील सर्वाधिक सर्च झालेलं शहर आहे. 45 दिवसांत 66 कोटींहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावत इतिहास केला.

Rahul Shelke

Prayagraj Most Searched City 2025: दरवर्षीप्रमाणे 2025 च्या अखेरीस गुगलने जगभरात सर्वाधिक सर्च झालेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या Most Searched Destinations 2025 यादीत भारताच्या प्रयागराज शहराने अव्वल स्थान पटकावलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी सर्वाधिक सर्च केलेलं हे भारतीय शहर आहे, यामागचं कारण म्हणजे महाकुंभ 2025.

45 दिवसांचा महाकुंभ मेळा

प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तब्बल 45 दिवस चाललेल्या या धार्मिक मेळ्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. श्रद्धा आणि परंपरेमुळे लोकांमध्ये प्रयागराजविषयीची उत्सुकता वाढली.

या 45 दिवसांतच 45 कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान करुन विक्रम केला. महाकुंभच्या समाप्तीपर्यंत हा आकडा 66 कोटींहून अधिक झाला. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे प्रयागराज केवळ धार्मिकच नव्हे, तर जागतिक नकाशावर ठळकपणे दिसू लागलं.

जगभरातील टॉप सर्च डेस्टिनेशन्स

प्रयागराजसोबतच यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या ठिकाणांमध्ये देश-विदेशातील अनेक पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

फिलिपिन्स
सुंदर समुद्रकिनारे, निळं पाणी आणि परवडणारा प्रवास यामुळे फिलिपिन्स भारतीय पर्यटकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय झालं. बोराकाय आणि पलावन ही बेटं चर्चेत होती.

जॉर्जिया
युरोपियन अनुभव देणारा हा देश डोंगररांगा, ऐतिहासिक शहरे, वाईन संस्कृतीमुळे हे शहर लांकाच्या पसंतीस उतरलं. त्बिलिसी आणि काझबेगी परिसर विशेष चर्चेत राहिला.

मॉरिशस
हनीमून आणि सुट्टीसाठी कायमच पसंतीचं ठिकाण. स्वच्छ समुद्रकिनारे, ब्लू लॅगून आणि उत्तम रिसॉर्ट्समुळे मॉरिशसची लोकप्रियता टिकून आहे.

काश्मीर
‘पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी ओळख असलेले काश्मीर बर्फाच्छादित डोंगर, डल लेक, शिकारे आणि गुलमर्गसारख्या पर्यटनस्थळांमुळे पुन्हा चर्चेत आलं.

फू क्वॉक (व्हिएतनाम)
सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळालेलं हे बीच डेस्टिनेशन शांत वातावरण, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि आलिशान रिसॉर्ट्ससाठी ओळखलं जातं.

फुकेट (थायलंड)
नाईटलाइफ, बीच पार्ट्या, आयलंड टूर आणि स्ट्रीट फूडमुळे फुकेट आंतरराष्ट्रीय सहलींसाठी अजूनही लोकप्रिय आहे.

मालदीव
ओव्हरवॉटर व्हिला, खाजगी समुद्रकिनारे आणि स्वच्छ पाणी.. मालदीव म्हणजे शांतता. कपल्स आणि हनीमून ट्रॅव्हलर्ससाठी लोकप्रिय आहे.

सोमनाथ
भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगामुळे सोमनाथ हे मोठं धार्मिक केंद्र आहे. धार्मिक पर्यटनात वाढ झाल्याने यंदा हे ठिकाण सर्वात जास्त सर्च केलं गेलं.

पाँडिचेरी
फ्रेंच वास्तुकला, शांत किनारे आणि निवांत वातावरणासाठी ओळखलं जाणारं पाँडिचेरी अनेक लोकांचं आवडतं ठिकाण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT