पुढारी वृत्तसेवा
शांत आणि नयनरम्य सरोवरांभोवती वसलेली शहरे पर्यटकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातील विरंगुळा ठरतात. देशातील काही सरोवरांची शहरे ही पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरली आहेत.
राजस्थानमधील उदयपूर हे शहर लेक पिचोला सरोवराभोवती वसले आहे. या शहरात राजवाडे, घाट आणि बागा आहेत, ज्यांचे प्रतिबिंब पाण्यात सुंदरपणे दिसते. चमकणारा लेक पॅलेस आणि सिटी पॅलेस शाही जगणं काय असते याची प्रचिती देतात. सूर्यास्तावेळी सरोवरातून केलेली बोट सफारी एक अविस्मरणीय अनुभव देते.
उत्तराखंडमधील हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले नैनिताल हे शहर बोटिंग, सरोवराकाठचे फेरफटका आणि दुकाने तसेच खाद्यपदार्थांनी गजबजलेला 'मॉल रोड' यासाठी प्रसिद्ध आहे. हे शहर वर्षभरासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील नयनरम्य दल सरोवर तरंगती हाऊसबोट्स, रंगीबेरंगी शिकारा आणि तरंगत्या बागांमुळे देशातील अन्य कोणत्याही सरोवर शहरापेक्षा वेगळे ठरते.
मध्य भारतातील 'सरोवरांचे शहर' अशी भोपाळ शहराची ओळख आहे. हे शहर नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या सरोवरांचे माहेरघर आहे. 'अप्पर लेक' (Upper Lake) किंवा भोेजताल (Bhojtal) पर्यटकांची आकर्षक केंद्र असणारे सरोवरे आहेत.
तामिळनाडूमधील कोडाईकॅनाल शहरातील 'कोडाईकॅनाल सरोवरा'भोवती सायकलिंग आणि शहराच्या धुक्यात न्हालेल्या पाईन वृक्षांच्या जंगलांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. कोडाईकॅनाल शांतता आणि साहसाचा परिपूर्ण मिलाफ देतो.
राजस्थानमधील पुष्कर हे सरोवर आणि वार्षिक उंट मेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. ५२ घाटांनी वेढलेले पुष्कर सरोवर हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते.
मेघालयातील शिलाँगला नैसर्गिक सरोवरांचे वरदान लाभले आहे. येथील 'उमियाम सरोवर' सर्वात प्रसिद्ध आहे. हे सरोवर शहर बोटिंग, कयाकिंगसाठी ओळखले जाते.