ChatGPT Parenting Pudhari
तंत्रज्ञान

ChatGPT Parenting: चॅटजीपीटीमुळे मुलं सांभाळणं होणार सोप; सॅम ऑल्टमनची भन्नाट आयडिया व्हायरल

ChatGPT Parenting: सॅम ऑल्टमनच्या कल्पनेचं काहींनी कौतुक केलं, तर काहींनी AI पालकांची जागा घेऊ शकत नसल्याचं मत व्यक्त केलं.

पुढारी वृत्तसेवा

ChatGPT Parenting: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ काम, शिक्षण किंवा लेखनापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता AI पालकत्वातही मदत करू शकतं. OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT चा वापर करून मुलांच्या दैनंदिन आयुष्याला अधिक मजेशीर बनवण्याची एक कल्पना मांडली आहे. मात्र, या कल्पनेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकी काय आहे ऑल्टमन यांची कल्पना?

सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत सांगितले की, पालकांनी आपल्या कुटुंबाचं फॅमिली कॅलेंडर ChatGPT शी जोडावं. त्याचबरोबर प्रत्येक मुलाची आवड-निवड, छंद आणि दैनंदिन सवयी AI ला समजावून सांगाव्यात. यानंतर ChatGPT दररोज सकाळी शाळेत जाताना मुलांसाठी वैयक्तिक (Personalized) पॉडकास्ट तयार करू शकतं.

या पॉडकास्टमध्ये काय असू शकतं?

ऑल्टमन यांच्या मते, या पॉडकास्टमध्ये त्या दिवसातील महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ—

  • एखाद्या मुलाचा फुटबॉल किंवा इतर खेळाचा सामना

  • वाढदिवसाची आठवण

  • शाळेतील महत्त्वाचे कार्यक्रम

  • मुलांच्या आवडीच्या बातम्या

  • प्रेरणादायी माहिती किंवा मनोरंजक गोष्टी

यामुळे मुलांना शाळेत जातानाच त्यांच्या दिवसाचे नियोजन समजेल आणि प्रवासही अधिक रंजक होईल.

सोशल मीडियावर चर्चा

ऑल्टमन यांची ही कल्पना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी या कल्पनेचं कौतुक करत, "हा AI चा अत्यंत स्मार्ट वापर आहे," असे मत व्यक्त केले.

ChatGPT Parenting

काहींनी उपस्थित केले प्रश्न

दुसरीकडे अनेक युजर्सनी या कल्पनेवर टीकाही केली. काहींचे म्हणणे होते की, पालकांनी मुलांशी थेट संवाद साधावा, त्यासाठी AI वर अवलंबून राहण्याची गरज नाही. काहींनी तर AI मानवी संवादाची जागा घेत असल्याचीही चिंता व्यक्त केली.

तर काही युजर्सनी असेही म्हटले की, आजची मुले आधीच मोठ्या प्रमाणावर AI आणि डिजिटल कंटेंटच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात AI चा आणखी हस्तक्षेप आवश्यक आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

AI की पालक?

या संपूर्ण चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. ChatGPT सारखी AI साधने पालकांची जागा घेण्यासाठी नाहीत, तर पालकांना मदत करणारे सहाय्यक म्हणून वापरली जाऊ शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

योग्य पद्धतीने वापर केल्यास AI मुलांचे वेळापत्रक, आठवणी, अभ्यास आणि माहिती अधिक प्रभावीपणे हाताळू शकतो. मात्र, मुलांशी होणारा भावनिक संवाद, संस्कार आणि नातेसंबंध यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.

सॅम ऑल्टमन यांच्या या कल्पनेमुळे AI चा भविष्यातील वापर आणि पालकत्वातील भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, तंत्रज्ञान आणि मानवी नातेसंबंध यामधील समतोल कसा राखायचा, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT