AI ने प्रत्येक क्षेत्रात आपली गरज निर्माण केली आहे. सर्वच क्षेत्रात आता AI चा वापर केला जात आहे. व्हिडीओ,फोटो, कंटेंट रायटिंग अशा अनेक पद्धतीमध्ये AI चा वापर सर्वत्र होत असताना आपल्याला दिसत आहे. शेतीमध्ये AI च्या मदतीने बऱ्याच गोष्टी करता येत आहेत. हवामानाचा अंदाज वर्तवण्यापासून झाडांना पाण्याची आवश्यकता किती आहे इथपर्यंत सर्व AI च्या मदतीने शक्य होत आहे. (Artificial Intelligence (AI) in Agriculture)
डेटा विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना कोणत्या वेळी कोणत्या संसाधनाचा वापर करावा तसेच कोणत्या प्रकारचे बियाणे वापरावे, पाण्याचा वापर किती करावा? हवामानाचा अंदाज, कीटकनाशकांचा वापर कसा करावा या संबंधित सर्व माहिती मिळणे यामुळे शक्य झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग किंवा कीटकांची भीती असते, रोग लागल्यामुळे उत्पादनात घट होते पिकांना लागलेल्या किडीविषयी माहिती नसेल आणि वेळीच उपचार झाले नाहीत तर नुकसान सहन करावे लागते यासाठी AI चा वापर केल्यामुळे पिकांमध्ये वाढ होईल आणि सुरक्षितता ही वाढते. या संदर्भातील वृत्त WIONने दिले आहे.
शेतीमध्ये AI चा वापर केल्याने अनेक कामे स्वयंचलित होतात. यामध्ये अनेक प्रकारच्या सेन्सर्सची मदत घेऊन शेतीमध्ये सिंचन ,खते आणि कीटकनाशकांचा वापर स्वयंचलितपणे होऊ शकतो. AI च्या मदतीने शेतात लागणारा वेळ आणि करावे लागणारे श्रम कमी होण्यास मदत होते.
चाट जीपीटीनंतर आता किसान जीपीटीचे आगमन झाल्याचे दिसत आहे. किसान जीपीटी हे खास करून शेतकऱ्यांना मदत करेल यासाठी उपलब्ध केले आहे. प्रतीक देसाई हे शेतकरी कुटुंबातले असल्याकारणाने त्यांना शेतकऱ्यांचे कष्ट माहिती होते, ते कष्ट कुठेतरी कमी होऊन त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांनी किसान जीपीटी सुरू केले. किसान जीपीटी हे चाट जीपीटी सारखेच आहे यामध्ये हिंदीसह 10 भारतीय भाषांचा समावेश आहे. यामध्ये आपण लिखित स्वरूपात आपले प्रश्न मांडू शकत नाही तर ते बोलून आपल्या प्रश्नाचे निरासन होऊ शकते.
आतापर्यंत 40 ते 50 हजार शेतकऱ्यांनी किसान जीपीटीचा वापर आपल्या शेतीसाठी केला आहे. तामिळनाडूमध्ये एका ऑर्गनायझेशनद्वारे किसान जी पी टी बद्दल माहिती प्रसारित होत आहे. किसान जीपीटी मध्ये शेती विषयक सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळते. भविष्यात किसान जीपीटी मध्ये बदलही होऊ शकतो .ज्यामध्ये टेक्स्टचा वापर असेल, तसेच एखाद्या फोटोच्या माध्यमातूनसुद्धा आपण माहिती मिळवू शकतो,त्याचबरोबर मार्केट प्राइस,शेतकऱ्यांसाठी योजना, हवामान यामधील सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.
हेही वाचा