AI Replacing Smartphone Apps Pudhari
तंत्रज्ञान

Smartphone Apps: स्मार्टफोनमधून अॅप्स गायब होणार; Nothingच्या CEOचा मोठा दावा, काय काय बदलणार?

AI Replacing Smartphone Apps: Nothing चे CEO कार्ल पेई यांनी भविष्यात स्मार्टफोनमधून अॅप्स गायब होऊन AI एजंट्स येतील असा दावा केला आहे. यूजर फक्त आदेश देतील आणि AI सर्व काम आपोआप पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले.

Rahul Shelke

AI Replacing Smartphone Apps: स्मार्टफोन वापरण्याची पद्धत येत्या काही वर्षांत पूर्णपणे बदलू शकते, असा मोठा दावा कार्ल पेई यांनी केला आहे. त्यांच्या मते, भविष्यात मोबाईलमधून पारंपरिक अॅप्स हळूहळू गायब होतील आणि त्यांची जागा एआय एजंट्स घेतील. या बदलामुळे यूजरला वेगवेगळ्या अॅप्समध्ये फिरण्याची गरज राहणार नाही.

SXSW या जागतिक टेक इव्हेंटमध्ये बोलताना कार्ल पेई यांनी सांगितले की, आज आपण वापरत असलेली स्मार्टफोन सिस्टम जवळपास 20 वर्षे जुनी आहे. लॉक स्क्रीन, होम स्क्रीन आणि वेगवेगळ्या अॅप्सचा वापर... ही संपूर्ण रचना फारशी बदललेली नाही. त्यामुळे ही प्रणाली कालबाह्य आणि गुंतागुंतीची झाली आहे.

त्यांनी एक साधं उदाहरण देत सांगितलं की, एखाद्या व्यक्तीला मित्रांसोबत कॉफीला जायचं असेल, तर त्याला रेस्टॉरंट बुकिंग, मेसेजिंग, कॅलेंडर सेट करणे आणि कॅब बुकिंग अशी अनेक अॅप्स वापरावी लागतात. एका छोट्या कामासाठी इतक्या स्टेप्स पार कराव्या लागतात, की यूजर स्वतःच ऑपरेटरसारखा वाटू लागतो.

पण भविष्यात ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे. कार्ल पेई यांच्या मते, एआय एजंट्स ही संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतील. यूजरने फक्त आपली गरज सांगायची. उदा. “मला संध्याकाळी 6 वाजता मित्रांसोबत कॉफीला जायचं आहे” आणि एआय स्वतः रेस्टॉरंट बुकिंग, कॅब, रिमाइंडर सगळं सेट करेल. त्यामुळे वेळ वाचेल.

हा बदल केवळ यूजर्सपुरता मर्यादित राहणार नाही, तर डेव्हलपर्स आणि टेक कंपन्यांसाठीही मोठं आव्हान असणार आहे. कार्ल पेई यांनी स्पष्ट इशारा दिला की, कंपन्यांनी आपली सिस्टीम बदलली नाही, तर त्या मागे पडू शकतात. भविष्यात अॅप्सऐवजी एआय एजंट्ससाठी API आणि कनेक्टर आधारित सिस्टीम विकसित करावी लागेल.

त्यांच्या मते, भविष्यात अॅप्स वापरणारा माणूस नसेल, तर एआय एजंट असेल. म्हणजेच, स्मार्टफोन वापरण्याची संपूर्ण पद्धतच बदलणार आहे. नवीन सिस्टिममध्ये यूजर फक्त आदेश देईल आणि बाकी सगळं काम एआय करेल.

कार्ल पेई यांच्या या विधानामुळे टेक जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्मार्टफोनमधून अॅप्स खरोखरच गायब होतील का, या प्रश्नाचं उत्तर आता येणारा काळच देईल. मात्र एक गोष्ट निश्चित एआयमुळे तंत्रज्ञान वापरण्याचा अनुभव अधिक सोपा, वेगवान आणि ऑटोमेटेड होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT