Top Government Jobs in India Pudhari
एज्युदिशा

Government Jobs: भारतातील टॉप 10 सरकारी नोकऱ्या; ज्यासाठी लोक करोडो रुपयांचे पॅकेज सोडतात

Government Jobs: खासगी क्षेत्रात कोट्यवधींचे पॅकेजेस असूनही सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण आजही कायम आहे. IAS, IPS, संरक्षण सेवा, RBI यांसारख्या नोकऱ्या केवळ पगारासाठी नव्हे, तर प्रतिष्ठेसाठी निवडल्या जातात.

Rahul Shelke

Top Government Jobs in India: आज खासगी क्षेत्रात आकर्षक पगार, बोनस आणि कोट्यवधींची पॅकेजेस मिळत असतानाही भारतात सरकारी नोकरीचे आकर्षण अजूनही कमी झालेले नाही. सन्मान, स्थैर्य, अधिकार आणि देशसेवेची भावना, या गोष्टी अनेक तरुणांना कोट्यवधींच्या ऑफर्सकडे पाठ फिरवून सरकारी नोकरीकडे वळायला भाग पाडतात. म्हणूनच दरवर्षी लाखो तरुण अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात.

  • भारतामध्ये सरकारी नोकरी ही केवळ रोजगाराचा मार्ग नाही, तर ती सामाजिक प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे प्रतीक मानली जाते. याच कारणामुळे काही विशिष्ट पदांसाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते.

  • सर्वात प्रतिष्ठित सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवांचा (IPS) समावेश होतो. या सेवेतील अधिकाऱ्यांकडे प्रशासनाची मोठी जबाबदारी असतेच, शिवाय समाजाला योग्य दिशा देण्याची संधीही मिळते.

  • भारतीय विदेश सेवा (IFS) ही आणखी एक मानाची सेवा मानली जाते. या सेवेत अधिकारी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या हितसंबंधांचे संरक्षण करतात आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम करतात.

  • भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी देशाच्या कर व्यवस्थेचा कणा मानले जातात. कर संकलन, आर्थिक शिस्त आणि महसूल व्यवस्थापन या माध्यमातून ते अर्थव्यवस्थेला बळकटी देतात.

  • संरक्षण सेवांमध्ये अधिकारी बनणे ही तर अनेकांसाठी अभिमानाची बाब असते. सेना, नौदल आणि वायुसेनेतील सेवा ही केवळ नोकरी नसून ती देशभक्तीची आणि बलिदानाची ओळख मानली जाते.

  • याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSU) अधिकारी पदावर काम करणाऱ्यांना सुरक्षित करिअर, स्थिर पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा समतोल साधता येतो.

  • भारतीय वन सेवा (IFoS) ही पर्यावरण संरक्षण, वनव्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाशी निगडित अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. वनव्यवस्थापनात योगदान देण्याची संधी या सेवेत मिळते.

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील ग्रेड ‘बी’ अधिकारी देशाच्या मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी, बँकिंग प्रणालीचे नियमन आणि आर्थिक स्थैर्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • अभियांत्रिकी सेवेतील (IES) अधिकारी देशातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांशी जोडले जातात. रस्ते, पूल, रेल्वे, जलसंपदा यांसारख्या प्रकल्पांमधून राष्ट्रनिर्मितीत त्यांचा थेट सहभाग असतो.

  • त्याचप्रमाणे न्यायिक सेवांमधील न्यायाधीश हे संविधानाचे रक्षक मानले जातात. कायदा आणि न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.

सध्याच्या काळात तरुणांसाठी पैसा महत्त्वाचा असला तरी सन्मान, स्थैर्य, अधिकार आणि समाजासाठी काम करण्याचे स्वप्न यांना अधिक महत्त्व आहे. म्हणूनच अनेकजण कोट्यवधींचे पॅकेज सोडून सरकारी सेवांचा मार्ग निवडताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT