

दीपक शिराळकर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दूरदृष्टी दाखवत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रांतर्गत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. जगात एआय तज्ज्ञांना प्रचंड मागणी असताना, सोलापूर विद्यापीठात मात्र या महत्त्वपूर्ण कोर्सकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
एआय कोर्ससाठी एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. नोकरीच्या संधी देणार्या या कोर्ससाठी शून्य प्रवेश असल्याने विद्यापीठासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माहितीचा अभाव किंवा भविष्यातील संधींविषयी अभाव यामागची प्रमुख कारणे असू शकतात.
पुरेशी माहिती उपलब्ध नाही
विद्यापीठाकडून या कोर्सच्या भविष्यकालीन संधींविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे महत्त्व समजत नाहीत. तसेच तरुणाईमध्ये प्रभावी असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कोर्सची आवश्यक जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात विद्यापीठ उदासीन ठरले आहे.
विद्यापीठासाठी उपाययोजना
विद्यापीठाने तत्काळ जागरूकता मोहीम राबवावी. कोर्सचे फायदे आणि नोकरीच्या संधी प्रभावीपणे मांडाव्यात. एआय करिअर मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत. विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी इंडस्ट्री इंटर्नशिप व प्लेसमेंटची निश्चिती करावी. प्रारंभीच्या बॅचसाठी शुल्क सवलत किंवा शिष्यवृत्ती जाहीर करावी.