Donald Trump Firing
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार. Pudhari News network
बहार

अमेरिकेच्या राजकारणाला हिंसाचाराचे ग्रहण

पुढारी वृत्तसेवा
अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डी सी

अमेरिकन राजकारण हिंसाचारामुळे चक्रव्यूहात कसे सापडले आहे, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराने पुन्हा एकदा जगापुढे आले. राजकीय हिंसाचार आणि देशांतर्गत दहशतवाद इथे असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्याबाबत आत्मपरीक्षण करून अपेक्षित बदल राजकीय पक्ष करणार का, हा खरा प्रश्न आहे. या हल्ल्याने निवडणुकीची राजकीय समीक रणे बदलली असून डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सोपा झाला आहे; तर जो बायडेन यांची स्थिती अधिक बिकट झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याने अध्यक्षीय निवडणुकीची सारी समीकरणे बदलून गेली असून सर्व राजकारण अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडले आहे. वीस वर्षांच्या थॉमस मॅथ्यू क्रूक्सने ट्रम्प यांच्यावर गोळीबार का केला, याचा शोध लागणे आता बरेच अवघड झाले आहे. कदाचित त्याला जिवंत पकडता आले असते तर ते शक्य होते. त्याने झाडलेली एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. पण त्यामुळे अमेरिकन लोकशाहीचे नाक मात्र कापले गेले, ही प्रतिक्रिया अधिक बोलकी म्हणायला हवी. निवडणुकीच्या तोंडावर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांतील राजकीय वैमनस्य टोकाला जात असल्याचे प्रचार सुरू झाल्यापासून दिसत आहे. धोरणात्मक टीकेऐवजी व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक करण्याची अहमहमिका लागलेली आहे. या वातावरणात ठिणगी कधीही पडू शकेल, अशी स्थिती असतानाच ही गोळीबाराची देशाला हादरून टाकणारी घटना घडली.

रिपब्लिकन अधिवेशनाचा बदलता नूर

विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी या शहरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्याच्या दोशन दिवस आधी हा प्रकार झाल्याने या अधिवेशनाचा सारा नूरच पालटून गेला. पक्षांतर्गत मतभेद विसरून सारे एकमुखाने ट्रम्प यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे आहेत हे विविध राज्यांच्या डेलिगेटसने ज्या आवेशाने आपल्या मतांचे आकडे जाहीर के ले, ज्या प्रकारची ट्रम्प यांना पाठिबा देणारी आक्रमक भाषणे झाली, त्यावरून स्पष्ट झाले. प्रायमरीमध्ये त्यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या मूळ भारतीय वंशाच्या निकी हेली ट्रम्प यांच्या समर्थनार्थ या अधिवेशनात बोलल्या यालाही महत्त्व आहे. ‘ब्लेसिंग इन डिसगाईस’ची जाणीव आता रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांना झाली असून त्यांच्यात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. ट्रम्प आता या सर्वांनाच तारणहार वाटत असणार. विशेषत: त्यांचा ख्रिश्चन मतदारांचा जो भक्कम आधार आहे, त्यांना आता अधिक आश्वासक वाटेल. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या मेगा प्रचाराला आता त्यांच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांची साथ मिळणार आहे. ट्रम्प यांना त्यांनी पूर्वी ‘अमेरिकेचे हिटलर’ म्हटले असले तरी आता त्यांच्या या मोहिमेचे ते प्रमुख सूत्रधार असतील. त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देणारा त्यांचाच नव्हे तर काठावरचा मतदारही यामुळे ट्रम्प यांच्याकडेे वळण्याची शक्यता आहे. बॅटलग्राऊंड किंवा स्विंग स्टेट म्हणून ओळखली जाणारी पेनसिल्व्हानिया, मिशिगन, विस्कॉन्सिन सारखी 5 ते 6 राज्ये आहेत. त्यात मताधिक्य मिळविणे हे अंतिम विजयासाठी महत्त्वाचे असते. तिथे जी अटीतटीची लढत होणार आहे, त्यावर दोन्ही पक्षांना अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. कोर्टाने दोषी ठरवल्यावर ट्रम्प म्हणाले होते, शेवटी, ते (काटा काढण्यासाठी) माझ्यामागे लागणार नाहीत, ते तुमच्यामागे लागतील. त्यांच्या मार्गात मी अडथळ्यासारखा उभा आहे. हीच वाक्ये त्यांनी प्रचारात अनेकदा वापरली होती. आता त्यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेने त्यांना याचा जणू पुरावाच मिळाला आहे. गोळीबारातून सावरून आता ते ‘लढ्याचा’ नारा देत आहेत. सुमारे 50 हजारांहून अधिक उपस्थिती असलेल्या या अधिवेशनात ट्रम्प हे सार्‍यांचे दैवत आहेत, असेच वातावरण होते. त्यांनी अधिवेशनाला कानाला बँडेज लावलेल्या स्थितीत भेट दिली, त्यावेळी त्यांचे लढाईत विजयी झालेल्या शूर सेनापतीच्या थाटात स्वागत झाले. गोळीबारानंतर जखमी अवस्थेतही उठून हाताची मूठ उंचावत त्यांनी त्याही अवस्थेत उपस्थितांना ‘फाईट, फाईट’चे आवाहन केले, ते छायाचित्र अमेरिकेचा राजकीय इतिहास बदलवू शकेल, अशीही येथील माध्यमातील चर्चा होती. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा निळा, तांबडा आणि पांढर्‍या रंगाचा राष्ट्रध्वज, व्यासपीठाच्या खालच्या बाजूचा तांबडा आणि पांढर्‍या रंगाचा पट्टा आणि ट्रम्प यांच्या चेहर्‍यावरून वाहणारे लाल रक्ताचे ओघळ हा सारा राष्ट्रीय ध्वजाच्या रंगसंगतीला पूरक असा क्षण ज्या छायाचित्रकाराने टिपला, त्याच्या कौशल्याची नोंदही इथे घेतली गेली. या घटनेनंतर ट्रम्प हे साधेसुधे उमेदवार कसे राहतील? देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारा लढवय्या नेता अशीच भावना रिपब्लिकन पक्षाची त्यांच्याबाबत आहे. ‘डिव्हाईन इंटरव्हेन्शन’ची भावना त्यांच्या चाहत्यात दिसू लागली आहे. ट्रम्प यांच्या खांद्यावर खुद्द येशू ख्रिस्ताने हात ठेवला असल्याची चित्रे पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी समाज माध्यमावर टाकली. या घटनेने ट्रम्प यांचा या निवडणुकीतील विजय सोपा झाला असून जो बायडेन यांची स्थिती आता आणखी अवघड झाली आहे. अर्थात निवडणुकीला अजूनही सुमारे चार महिन्यांचा अवधी आहे. मतदारांची स्मरणशक्ती फार काळ टिकत नाही. तथापि या घटनेचा ट्रम्प कसा वापर प्रचारात करतात, यावर बरेच काही अवलंबून असेल.

ट्रम्प यांना नशिबाची साथ

सहा महिन्यांपूर्वी ट्रम्प कोंडीत सापडल्यासारखे होते. न्यूयॉर्कयेथील कोर्टात हश मनी खटल्यात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक खासगी बाबी चव्हाट्यावर येत होत्या. आरोपीच्या पिंजर्‍यात अडकलेला त्यांचा हताश चेहरा सातत्याने टीव्हीवर दाखविला जात होता. या खटल्यात दोषी ठरल्याने त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. इतरही आरोपांच्या खटल्यांची टांगती तलवार त्यांच्यावर होती. पण जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन हे रायफल खरेदीच्या खटल्यात दोषी ठरविले गेल्यानंतर चित्र बदलण्यास सुरुवात झाली. सीएनएनच्या जाहीर टीव्ही डिबेटमध्ये त्यांनी जो बायडेन यांच्यावर आपल्या स्मार्ट शैलीने मात केली. तो मात्र प्रचाराला कलाटणी देणारा टप्पा ठरला. हे दोघेही वयोवृद्ध आहेत. पण या डिबेटमध्ये बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प अधिक आत्मविश्वास असलेले, कितीतरी तरुण असल्यासारखे वाटले. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत या ‘ऑप्टिक्स’ला खूप महत्त्व आले आहे. उमेदवाराचे दिसणे, त्याचा चुणचुणीतपणा, त्याची देहबोली हे सर्व बारकाईने टिपले जाते. त्यात बायडेन मागे पडले. बोलताना ते अडखळत होते. त्यांना शब्द सापडत नव्हते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, या मागणीचा रेटा सुरू झाला. हा दबाव अजूनही कायम आहे. या घटनेनंतर आपला पक्ष आपल्या मागे संघटितपणे उभा राहील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत ताणतणाव बघत ट्रम्प हा सारा खेळ मध्यंतरी शांतपणे पाहात होते. नशीब त्यांच्यावर मेहेरबान होते. अमेरिकन अध्यक्षाला एखाद्या अधिकृत कृतीसंबंधात खटल्यांपासून संरक्षण (इम्युनिटी) देण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांचा आणखी एक विजय होता. आता हा प्राणघातक हल्ला होणे, ही अर्थातच वाईटच घटना होती. पण त्यामुळे त्यांची प्रतिमा बदलविण्यास त्यांना मदतच झाली. म्हणूनच त्यांना रिपब्लिकन अधिवेशनात ‘हिरोज वेलकम’चा सन्मान मिळू शकला. परिस्थितीची गतिशीलता एखाद्याचे अंधकारमय विश्व अचानक कसे अल्पावधीत उजळवू शकते, याचे हे उत्तम उदाहरण. या निवडणुकीत बायडेन हेच उमेदवार राहावेत, असे ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना वाटते. कारण तसे झाले तर त्यांना ही लढाई जिंकणे अधिक सुकर होईल.

विनिंग हॉर्सची चाहूल

विनिंग हॉर्स कोण आहेत, याची चाहूल उद्योग विश्वातील धूर्त उद्योगपतींना सर्वात आधी लागत असते हे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या बदललेल्या भूमिकेवरून लक्षात येईल. त्यांच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपण राजकारणापासून अलिप्त, स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता त्यांनी आपली निष्ठा ट्रम्प यांच्या चरणी वाहिली आहे. इतकेच नव्हे तर दरमहा 4 कोटी 50 लाख डॉलर एवढी रक्कम ते त्यांच्या प्रचारासाठी देणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ इतर अब्जाधीशांनीही त्यांच्या प्रचारासाठी आपल्या पैशाच्या थैली सैल सोडल्या आहेत.

दुभंगलेली अमेरिका

अर्थात या निवडणुकीपुरता गोळीबाराच्या घटनेचा विचार करता येणार नाही. अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराच्या संबंधात काही प्रश्न त्यातून उपस्थित झाले आहेत. दुभंगलेल्या अमेरिकेला देशांतर्गत दहशतवाद आणि राजकीय पातळीवरील वाढता हिंसाचार याचे जे ग्रहण लागले आहे, त्याचे उत्तर सर्वच राजकीय पक्षांना शोधावे लागेल. अमेरिका ही ‘परिपूर्ण युनियन’ व्हावी , अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी 15 वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. ‘अमेरिकन ड्रीम’खर्‍या अर्थाने साकार करावयाचे असेल तर या देशातील सायलेंट मेजॉरिटीला सावध राहून पावले उचलावी लागतील, देश त्यामुळे महान होऊ शकेल. ट्रम्प यांच्या मूठ आवळलेल्या स्थितीतील लढ्याचे आवाहन करणारे छायाचित्र हे लोकशाहीच्या विजयाचे प्रतीक नसून संवाद संपल्याचे सूचक प्रतीक म्हणूनही त्याच्याकडे दुसर्‍या द़ृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या संपादकीय मंडळाने आपल्या संपादकीयात जे भाष्य केले आहे, ते या प्रश्नामागच्या कारणावर प्रकाश टाकणारे आहे. ‘अमेरिका सध्या ज्या अंध:कारमय भयावह स्थितीत आहे, त्याला येथील वाढते सांस्कृतिक आणि राजकीय ध्रुवीकरण, सर्वत्र सहजपणे उपलब्ध होणार्‍या बंदुका, रायफली आणि वेगवेगळ्या गन्स आणि इंटरनेटच्या माध्यमाची लोकांची माथी भडकावण्याची ताकद हे घटक काही अंशी जबाबदार आहे’, असे त्यात म्हटले आहे.

राजकीय हिंसाचाराचा इतिहास

राजकीय हिंसाचाराचा या देशाचा इतिहासही विसरता येणार नाही. 1865 मध्ये अब्राहम लिंकन या अध्यक्षांची पहिली हत्या झाली. त्याच्यापाठोपाठ 1881 मध्ये जेम्स गारफिल्ड, 1901 मध्ये विल्यम मॅककिन्ली आणि 1963 मध्ये जॉन एफ. केनेडी या अध्यक्षांना गोळीबाराच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. याखेरीज रोनाल्ड रेगन आणि थिओडोर रुझवेल्ट हे अध्यक्ष अशाच हल्ल्यात जखमी झाले होते. पण आज जे ध्रुवीकरण, परस्परांविषयी टोकाचा राग, द्वेष आणि दुरावा दिसत आहे तसे पूर्वी कधीही नव्हते. बटलर इथे गोळीबाराची घटना घडल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच रिपब्लिकन पक्षातील टिम स्कॉट तसेच उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांनी अतिशय प्रक्षोभक भाषा वापरून डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाला या घटनेसाठी जबाबदार धरले. ‘ट्रम्प फॅसिस्ट, हुकूमशहा वृत्तीचे असून लोकशाहीला त्यांचा मोठा धोका आहे, देशाला ते विनाशाकडे नेणार आहेत, असा प्रचार बायडेन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला. त्यामुळे निर्माण झालेल्या विखारी वातावरणातून हा हत्येचा प्रयत्न झाला’, अशा आशयाच्या पोस्ट टाकताना त्यांनी अधिक आक्रमक भाषा वापरली. याचा अर्थ कोणीच यापासून धडा घ्यायला तयार नाही. अलीकडे बायडेन यांनीही सर्वांनाच आपला राजकीय सूर जहाल न करता वातावरण निवळण्यासाठी अधिक सौम्य क रण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांना कोणत्याही किमतीत रोखले पाहिजे, असे म्हणताना त्यांनी ‘बुल्स आय’ हे शब्द वापरले होते . त्यांना लक्ष्य करा, असा त्याचा अर्थ होतो. ही आपली चूक झाली, हे त्यांनी अलीकडेच मान्य केले. पण ट्रम्पही बायडेन यांची अनेकदा खिल्ली उडवत होते. क्रूकेड, स्लीपी जो बायडेन अशी त्यांची हेटाळणी करीत होतेे. ते कसे भ्रमिष्ट झाल्यासारखे गोंधळलेल्या अवस्थेत स्टेजवर वावरतात, याची नक्कलही करीत होते. त्यामुळे हे वातावरण बिघडावयाला दोन्ही पक्षाचे नेते कारणीभूत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 10 वर्षांत काँग्रेस (संसद) चे सदस्यही या हिंसाचारात सापडल्याचे दिसते. ट्रम्प यांनी 6 जानेवारी 2021 रोजी आपला निवडणुकीतील पराभव अमान्य करीत आपल्या समर्थकांकरवी कॅपिटॉल हिलवर जो हिंसक हल्ला घडवून आणला, तो तर या सर्वांवर कडी करणारा होता. हिंसाचाराला ट्रम्प यांनीही फूस दिल्याचे कोणीच नाकारू शकणार नाही. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची त्यांनी कम्युनिस्ट, मार्क्सिस्ट, फॅसिस्ट, रॅडिकल लेफ्टिस्ट ठग्ज अशी संभावना केली असून बेकायदेशीर स्थलांतरित देशाचे रक्त नासवून विषारी करीत आहे, अशीही टीका केली आहे. अलीकडे कडव्या गटांकडून मोठ्या प्रमाणावर चळवळीतही हिंसाचार झाला आहे. सरकारी इमारतींवर हल्ले, लुटालूट, पोलिसांवर हल्ले असे प्रकार वारंवार होतात. अलीकडेच गाझा प्रश्नावरून 50 हून अधिक विद्यापीठांत झालेल्या आंदोलनाना शेवटच्या टप्प्यावर क से हिंसक वळण लागले, हे इथे सर्वांनी पाहिलेले आहे. लोकशाहीला घातक ठरणार्‍या या हिंसाचाराबाबत आत्मपरीक्षणाची वेळ इथे संबधितांवर आली आहे. राजकीय हिंसाचार आणि देशांतर्गत दहशतवाद हे अमेरिकेच्या असुरक्षिततेला कारणीभूत ठरत आहेत. अलीकडील काळात समाजमाध्यमांचा प्रभावही वाढत चालला आहे. अनेक संवेदनशील विषयांवर दिशाभूल करणारी माहिती त्यावरून व्हायरल होत असते. त्याची सत्यासत्यताही तपासता येत नाही. फेक न्यूज, डीपफेक यासारख्या प्रकारामुळे तर खरे-खोटे करणे अधिक अवघड होत आहे. त्यातून प्रक्षोभ उसळून हिंसक प्रकारही झाले आहेत.

घातक मुक्त बंदूक धोरण

अमेरिकेतील हिंसाचाराचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे येथील घातक मुक्त बंदूक संस्कृती. बाजारातून कँडी किंवा एखादे चॉकलेट घ्यावे इतक्या सहजपणे इथे बंदूक, रायफली विकत घेता येतात. विरोधाभासाचा भाग हा की, रिपब्लिकन पक्षच या संस़्कृतीचा समर्थक आहे. खुद्द ट्रम्प यांनी या धोरणाचे आपण किती मोठे समर्थक आहोत, असे अभिमानाने कित्येकदा सांगितले आहे. तथापि याच बंदुकीचे ते बळी ठरले असते, हे ते बहुधा आता विसरणार नाहीत. ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराची घटना ही एका अर्थाने गेमचेंजर ठरू शकते. अमेरिकेची लोकशाही आदर्श असावी अशी सार्‍या जगाची अपेक्षा आहे, हे या महासत्तेला विसरता येणार नाही.

SCROLL FOR NEXT