पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. पॉर्न स्टारला तोंड बंद करण्यासाठी गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प दोषी आढळले आहेत. ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप सिद्ध झाल्याने ते दोषी आढळले आहेत. दरम्यान ट्रम्प (Donald Trump) यांच्या शिक्षेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भातील वृत्त माध्यमांनी दिले आहे.
अमेरिकेच्या 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी एका पॉर्न स्टारसोबतचे संबंध लपवण्यासाठी पैसे दिल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना गुरुवारी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने त्यांच्या खटल्यात सर्व 34 गंभीर आरोपांसाठी दोषी ठरवले.
ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचे प्रकरण 2016 चे आहे. वास्तविक, ट्रम्प यांचे या पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याचे समोर आले असून ते लपवण्यासाठी त्यांनी स्टॉर्मीला 1 लाख 30 हजार रुपये दिल्याचा आरोप आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेला खटला अपमानास्पद आणि फसवा असल्याचा दावा (Donald Trump) केला आहे.
न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या न्यायाधीशांनाच ट्रम्प यांनी वादग्रस्त म्हटले आहे. ते म्हणाले, हा खटला एका वादग्रस्त न्यायाधीशाने चालवलेला हे लज्जास्पद आहे. सध्या आपल्या देशात सर्वत्र हेराफेरी सुरू आहे. बायडेन प्रशासनाने राजकीय प्रतिस्पर्ध्याला दुखावण्यासाठी हे सर्व केले आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.