डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (दि.१३) प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला झाला. पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होवू लागला आहे.
अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता
हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. ही गोळी दोन सेंटीमीटरने चुकली आणि गोळी कानाला चाटून गेली. अन्यथा डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव गेला असता.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. काहीतरी गडबड होत असल्याचे मला कळले, मोठा आवाज ऐकू आला, गोळ्यांचा आवाज ऐकू आला, लगेच गोळी कानाला लागून गेल्याचे जाणवले."
गोळीबारात हल्लेखोरासह दोघांचा मृत्यू
पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचार रॅलीदरम्यान शनिवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली. गोळी लागल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ स्टेजवरुन खाली उतरवुन कारमध्ये नेले. या गोळीबारात हल्लेखोरासह दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मधील एक व्यक्ती ट्रम्प यांची समर्थक आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे.
सीक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प स्टेजवरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले. सीक्रेट सर्व्हिस या गोळीबाराचा तपास करत आहेत. एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदूकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.