Ganesh Chaturthi 2026  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Ganesh Chaturthi 2026 : हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडावा?

Ganpati Utsav 2026: तब्‍बल ९ वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा

पुढारी वृत्तसेवा

Ganpati gauri pujan 2026 date in marathi

भारतात सर्वत्र दिनांक १४ सप्टेंबर रोजी सोमवारी भाद्रपद शु. तृतीयेच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयकाली तृतीया व मध्याह्नी चतुर्थी असल्याने ही दोन्ही व्रते एकाच दिवशी आलेली आहेत. जाणून घेवूया पंचांगकर्ते मोहन दाते यांनी हरितालिका-गणेश चतुर्थी हे दोन्‍ही उत्‍सव केव्‍हा व कसे साजरी करावेत, याबाबत केलेल्‍या मार्गदर्शनाविषयी...

हरितालिका पूजन आणि गणेशपूजन करण्यासाठी वेळेचे नियम आहेत का?

तिथीचे सूर्योदयकाली असणे, मध्याह्नकाली असणे इत्यादी नियम व्रताच्या दिननिश्चितीकरिता आहेत. व्रतकर्त्याने त्या कालावधीतच पूजन करावे असे अभिप्रेत नसते. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०७ वाजता तृतीया समाप्तीपर्यंतच हरितालिका पूजन करावे किंवा त्यानंतरच गणेशपूजन करावे असे काहीही नाही. तृतीया समाप्तीपूर्वी अथवा समाप्ती झाल्यानंतरही हरितालिका पूजन करता येईल.

श्रीगणेशमूर्तीची स्थापना आणि पूजनाची योग्य वेळ कोणती? ganpati pratishthapana 2026

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०७ पूर्वी देखील गणेश चतुर्थीनिमित्त पार्थिव गणेशपूजन करता येईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना व पूजन करता येईल. याकरिता भद्रादि (विष्टि) कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्ताची आवश्यकता नाही. दोन्ही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येईल. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरही करता येऊ शकते.

हरितालिकेचा उपवास कधी आणि कसा सोडावा?

हरितालिकेचा उपवास दिवसभर असतो, हा उपवास दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी मंगळवारी सोडावा. ज्यांना ऋषिपंचमीचाही उपवास आहे, त्यांनी १५ सप्टेंबरला सकाळी हरितालिकेची उत्तरपूजा करून तिचे विसर्जन करावे. त्यानंतर भाताच्या एका घासाचा वास घेऊन हरितालिकेचा उपवास सोडावा आणि ऋषिपंचमीचा उपवास नेहमीप्रमाणे करावा. (याआधी २००६ व २००९ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या.

गणेशपूजन किती दिवस करावे? विसर्जनाबाबतचे नियम काय सांगतात?

गणेशोत्सव दीड, ३, ५, ७ दिवस किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. जेवढे दिवस उत्सव असेल तेवढे दिवस रोज सकाळी व संध्याकाळी पूजा-आरती करावी. घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे; अशा वेळीही विसर्जन करता येते.धर्मशास्त्रानुसार प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन होणे आवश्यक आहे. ते वाहत्याच पाण्यात केले पाहिजे असे नसून, तलावात, टँकमध्ये किंवा घरातील बादलीतही करता येते.

मूर्ती शाडूची किंवा मातीची का असावी?

विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी (POP ची नसावी). धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सवमूर्ती म्हणून पूजन करून आरास करता येते, मात्र विसर्जन लहान मातीच्या मूर्तीचे करून धातूची मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवता येते.

यंदा गौरी आवाहनाचे आणि पूजनाचे दिवस कोणते आहेत?

  • गौरी आवाहन: १७ सप्टेंबर (गुरुवार) – अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७:५४ पर्यंत कधीही करता येईल.

  • गौरी पूजन: १८ सप्टेंबर (शुक्रवार) – ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असताना नेहमीप्रमाणे पूजन करावे.

  • गौरी विसर्जन: १९ सप्टेंबर (शनिवार) – मूळ नक्षत्रावर दिवसभरात कधीही विसर्जन करता येईल.

यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा का आहे?

२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेशस्थापनेपासूनचा १२ वा दिवस असल्याने यंदा १२ दिवसांचा उत्सव असेल (याआधी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव आला होता). तसेच पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे ४ सप्टेंबर २०२७ रोजी येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT