

लातूर : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि शांततामय सहजीवनाचा संदेश देणारा उत्सव ठरावा, यासाठी लातूर जिल्ह्यात यंदाही ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा केला जाणार आहे. कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, लेझीम, लोककला आणि लोकनृत्यांना प्राधान्य देऊन सुसंस्कृत लातूरची ओळख जपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन आणि शांततेचा संदेश देत आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले. दयानंद सभागृह येथे गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित लातूर जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक तथा लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना आय. एन., उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्यासह पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा कायम ठेवत इतरांसमोर नवा आदर्श निर्माण करावा. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी केले.
पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्यादृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शक्य असल्यास ही यंत्रणा गणेशोत्सवानंतरही कायमस्वरूपी कार्यरत ठेवावी. पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये प्रभावी समन्वय राहावा, यासाठी यंदा ‘एक मंडळ–एक पोलीस अंमलदार’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
नियुक्त पोलीस अंमलदार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून गर्दी व्यवस्थापन, मिरवणूक नियोजन, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणार आहे. मंडळांनी विनापरवानगी मंडप अथवा मिरवणूक काढू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांनीही विविध सूचना मांडल्या.
जिल्ह्याबाहेरील डीजे आणल्यास कारवाई
जिल्ह्याबाहेरून डीजे आणून गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित डीजे मालक तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिला. गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी मंडळांनी मिरवणुकांमध्ये लेझीम, ढोल-ताशा, झांज पथक, पारंपरिक वाद्ये, लोककला आणि लोकनृत्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पारंपरिक कलाप्रकारांमुळे उत्सवाला सांस्कृतिक स्वरूप मिळण्यासोबतच स्थानिक कलाकार आणि कलापथकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.