Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: 'या' 5 कारणांमुळे सेन्सेक्स 1,200 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपये बुडाले

Sensex Crash Today: जोरदार विक्रीमुळे सोमवारी सेन्सेक्स जवळपास 1,200 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 23,845 पर्यंत घसरला. गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले.

पुढारी वृत्तसेवा

Why Is the Indian Stock Market Falling: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी, 11 मे रोजी बाजार उघडताच जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले. यामुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 4 लाख कोटी रुपयांची घट झाली.

30 शेअर्सच्या सेन्सेक्समध्ये जवळपास 1,200 अंकांची घसरण झाली आणि तो दिवसातील नीचांकी 76,166 अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 50 निर्देशांकही 23,845 च्या पातळीपर्यंत घसरला. मोठ्या कंपन्यांबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही मोठा फटका बसला.

BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप मागील सत्रातील 473.5 लाख कोटी रुपयांवरून घसरून जवळपास 469 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच, एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 4 लाख कोटी बुडाले आहेत.

विशेष म्हणजे, बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला आहे. एप्रिलमध्ये जवळपास 7 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर मे महिन्यात बाजार पुन्हा निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे.

शेअर बाजार का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

1. अमेरिका-इराण चर्चा

मिडल ईस्टमधील तणाव कमी होईल, अशी आशा होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

इराणच्या अणु कार्यक्रमावरून अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आखाती भागात संघर्ष आणखी वाढू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला.

2. मोदींच्या ‘काटकसरीच्या आवाहना’चा परिणाम?

काही तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचाही बाजारावर परिणाम झाला आहे. रविवारी मोदींनी नागरिकांना पेट्रोल, डिझेल, गॅसचा वापर कमी करण्याचं, परदेश प्रवास टाळण्याचं आणि एक वर्ष सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं.

काही बाजार विश्लेषकांच्या मते, या प्रकारच्या ‘काटकसरीच्या संदेशामुळे’ अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होण्याची भीती निर्माण होते. जर लोक खर्च कमी करू लागले, तर कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो आणि याचा परिणाम शेअर बाजारावर दिसू शकतो.

3. कच्च्या तेलाचा भडका

ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा 105 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. मिडल ईस्टमधील तणाव आणि तेल पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे तेलाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून उच्च पातळीवर आहेत.

भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी 85 ते 90 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे तेल महागलं की देशावर आर्थिक ताण वाढतो. महागाई वाढते आणि कंपन्यांच्या खर्चातही वाढ होते.

4. रुपयाची घसरण

सोमवारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 40 पैशांनी घसरून 94.88 वर उघडला. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरची वाढती मागणी यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे.

रुपया घसरल्यास परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा बाहेर जाऊ शकतो. यामुळे बाजारावर आणखी दबाव येऊ शकतो.

5. तांत्रिक कारणांचाही प्रभाव

निफ्टीने 24,000 चा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल तोडला आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, जर निफ्टी 24,340 च्या वर बंद झाला नाही, तर बाजारात अजून घसरण होऊ शकते.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 23,800 ही पुढची महत्त्वाची सपोर्ट पातळी असू शकते. जर तीही तुटली, तर बाजारात आणखी अस्थिरता वाढू शकते.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण प्रामुख्याने जागतिक तणाव, तेल दरवाढ आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे आहे. त्यामुळे अल्पकालीन अस्थिरता वाढू शकते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती समजून घेत सावध भूमिका घेणं गरजेचं आहे.

नोंद: गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT