India Inflation: भारत आर्थिक संकटात! महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅसचे भाव वाढणार; अर्थतज्ज्ञांनी दिला मोठा इशारा

India Inflation GDP: मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात, असा इशारा ADB ने दिला आहे. यामुळे भारतात महागाई 6.9 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, तर GDP वाढीचा वेग 6.3 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो.
India Inflation GDP
India Inflation GDPPudhari
Published on
Updated on

India Inflation GDP: मिडल ईस्टमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण-अमेरिका संघर्ष आणि आखाती भागातील अस्थिरतेमुळे जागतिक तेल बाजारावर दबाव वाढला असून, याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आशियाई विकास बँक म्हणजेच ADB ने भारतासाठी चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

ADB च्या मते, मिडल ईस्टमधील संकट लांबले तर कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे भारतात महागाई वाढू शकते आणि आर्थिक विकासदर म्हणजेच GDP वरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

PTI च्या अहवालानुसार, ADB चे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांनी सांगितलं की, जर मिडल ईस्टमधील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

ADB च्या अंदाजानुसार, 2026 मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 96 डॉलरपर्यंत राहू शकते. तर 2027 मध्येही ती सुमारे 80 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच तेलाचे दर लवकर कमी होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.

भारताच्या GDP वाढीवर परिणाम

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा फटका भारताच्या आर्थिक वाढीलाही बसू शकतो. ADB ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज कमी केला आहे.

याआधी एप्रिलमध्ये ADB ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताची GDP वाढ 6.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता हा अंदाज 0.6 टक्क्यांनी कमी होऊन 6.3 टक्क्यांवर येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

म्हणजेच, आर्थिक वाढ पूर्णपणे थांबणार नाही, पण तिचा वेग कमी होऊ शकतो. मात्र, ADB ने पुढील वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सुधारण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

India Inflation GDP
Gold Silver Rate: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्या-चांदीचे भाव कोसळले; जाणून घ्या आजचे दर

महागाईचा मोठा धोका

तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम केवळ GDP पुरता मर्यादित राहत नाही. याचा थेट परिणाम महागाईवर होतो. ADB ने चालू आर्थिक वर्षासाठी भारतातील महागाईचा अंदाज मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. याआधी 4.5 टक्के महागाईचा अंदाज होता, पण आता तो वाढून 6.9 टक्क्यांवर जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच महागाईत तब्बल 2.4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाई का वाढू शकते?

भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा तेल आणि नैसर्गिक वायू आयात करून पूर्ण करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल-गॅस महाग झाले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो.

पेट्रोल-डिझेल महागलं तर वाहतूक खर्च वाढतो. त्याचा परिणाम रोजच्या वस्तूंच्या किमतींवर होतो. याशिवाय, गॅस महागल्यास खतांचे दर वाढू शकतात.

खतं महागली तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. काही शेतकरी कमी खतं वापरण्याचा पर्याय निवडू शकतात, ज्यामुळे पिकांचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. आणि उत्पादन कमी झालं की अन्नधान्य महाग होण्याचा धोका वाढतो.

India Inflation GDP
Petrol Diesel Price Hike: महागाईचा झटका! पेट्रोल 18 तर डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार

मोदींच्या आवाहनामुळे चर्चा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आणि संसाधनांची बचत करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनामुळे देश आर्थिक संकटाच्या दिशेने जातोय का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या परिस्थिती चिंताजनक असली तरी घाबरण्याचं कारण नाही. मात्र, जर मिडल ईस्टमधील तणाव आणखी वाढला आणि तेलाचे दर वाढले, तर त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई, अर्थव्यवस्था आणि सामान्य लोकांच्या खर्चावर होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news