Volkswagen Restructuring: जगातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगन समूहाने (Volkswagen Group) आपल्या व्यवसायात मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 2030 पर्यंत जागतिक स्तरावरील आपल्या कार मॉडेल्सची संख्या जवळपास 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उत्पादन प्रक्रिया अधिक सोपी आणि फायदेशीर करण्यासाठी मॉडेल्स, व्हेरिएंट्स आणि फीचर्समध्येही मोठी कपात केली जाणार आहे.
कंपनीच्या या निर्णयामुळे फोक्सवॅगन समूहाच्या अनेक लोकप्रिय कार बंद होणार आहेत. मात्र, कोणती मॉडेल्स बंद केली जाणार आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आतापर्यंत कंपन्या अनेक मॉडेल्स उपलब्ध करुन देण्यावर भर देत होत्या. मात्र, फोक्सवॅगनने ही रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता सर्वाधिक मागणी असलेल्या आणि नफा देणाऱ्या मॉडेल्सवरच लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल आणि संशोधन तसेच उत्पादन खर्चातही बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे.
फोक्सवॅगन केवळ कार मॉडेल्सच कमी करणार नाही, तर प्रत्येक मॉडेलमधील विविध व्हेरिएंट्स आणि फीचर पर्यायांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे.
कंपनीचे उद्दिष्ट उत्पादनातील गुंतागुंत सुमारे 75 टक्क्यांनी कमी करण्याचे आहे. यामुळे भविष्यात कमी ट्रिम लेव्हल आणि मर्यादित फीचर असलेली वाहने बाजारात येण्याची शक्यता आहे. तसेच विविध ब्रँड्समध्ये समान तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याचाही कंपनीचा प्रयत्न आहे.
फोक्सवॅगन समूहाकडे फोक्सवॅगनसह स्कोडा, सीट (SEAT), पॉर्शे, बेंटली, लॅम्बोर्गिनी यांसारखे दहा हून अधिक वाहन ब्रँड्स आहेत. मॉडेल पोर्टफोलिओ कमी करण्याच्या या निर्णयाचा परिणाम या सर्व ब्रँड्सच्या आगामी उत्पादनांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंपनीच्या मते, जागतिक वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. विशेषतः चीनमधील वाहन कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा, इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने होणारे संक्रमण, संशोधनावर होणारा वाढता खर्च तसेच बदलती ग्राहकांची पसंती यामुळे व्यवसायावर दबाव वाढला आहे.
याशिवाय 2021 नंतर कंपनीच्या नफ्यातही लक्षणीय घट झाल्याने खर्च कमी करणे ही आता कंपनीची प्रमुख रणनीती बनली आहे. फोक्सवॅगनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ऑलिव्हर ब्लूम यांच्या मते, या नव्या धोरणामुळे कंपनी अधिक स्पर्धात्मक, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सक्षम बनेल.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, या प्रक्रियेदरम्यान काही उत्पादन प्रकल्प बंद होण्याची शक्यता असून कर्मचारी संख्येतही कपात केली जाऊ शकते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, CEO ऑलिव्हर ब्लूम यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेसेजमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी सुमारे 50 हजार अतिरिक्त नोकऱ्या कमी करण्याची गरज भासू शकते, असे नमूद केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या संभाव्य नोकरकपातीबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही माहिती सध्या माध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे.
फोक्सवॅगन ही उत्पादनाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे. 2025 मधील उपलब्ध आकडेवारीनुसार, टोयोटाने सुमारे 1 कोटी 13 लाखांहून अधिक वाहने, तर फोक्सवॅगनने सुमारे 89.8 लाख वाहने तयार केली होती.
कोविड-19 पूर्वी कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता जवळपास 1.2 कोटी वाहनांची होती. मात्र, गेल्या काही वर्षांत ही क्षमता कमी झाली असून युरोप आणि चीनसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये उत्पादन आणखी कमी करण्याची तयारी सुरू आहे.
2030 पर्यंत फोक्सवॅगन आपल्या जागतिक मॉडेल लाइन-अपमध्ये 50 टक्क्यांची कपात करणार असल्याने हा निर्णय कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानला जात आहे.
या निर्णयाचा परिणाम केवळ कंपनीच्या उत्पादन धोरणावरच नव्हे, तर भविष्यात बाजारात येणाऱ्या नवीन वाहनांच्या संख्येवर, उत्पादन खर्चावर आणि रोजगाराच्या संधींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.