

नरेंद्र क्षीरसागर
पावसाळ्यात गाडीचे नुकसान झाल्यास नेहमीची कॉम्प्रेहेंसिव्ह (सर्वसमावेशक) कार इन्शुरन्स पॉलिसी सर्व प्रकारचा खर्च कव्हर करेलच असे नाही. विम्याचे नूतनीकरण (रिन्युअल) करताना काही महत्त्वाचे अॅड-ऑन्स (अतिरिक्त कव्हरेज) घेतल्यास पावसाळ्यात होणार्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून स्वतःचा बचाव करता येतो.
पूर किंवा रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे गाडीच्या इंजिनमध्ये पाणी जाण्याचा मोठा धोका असतो. नेहमीच्या पॉलिसीमध्ये इंजिनच्या अंतर्गत भागांचे होणारे असे नुकसान कव्हर केले जात नाही. इंजिन प्रोटेक्ट कव्हर घेतल्यास पाणी शिरल्यामुळे खराब झालेले इंजिनचे अंतर्गत भाग, गिअरबॉक्स आणि ट्रान्समिशन असेंब्ली दुरुस्त करण्याचा किंवा बदलण्याचा खर्च विमा कंपनी उचलते. विशेषतः ज्या शहरांमध्ये पाणी साचण्याची समस्या जास्त आहे, तिथे राहणार्या वाहनधारकांसाठी हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत बॅटरीच्या संरक्षणासाठीही काही कंपन्या असे विशेष कव्हर देतात.
साध्या विम्यामधून क्लेम मंजूर झाला तरी जुन्या भागांच्या घसार्यामुळे (डेप्रिसिएशन) मिळणारी रक्कम कमी होते आणि प्लास्टिक, रबर किंवा काचेच्या भागांसाठी वाहनधारकाला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. झीरो डेप्रिसिएशन अॅड-ऑनमुळे हा घसारा पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात माफ होतो आणि बदलण्यात आलेल्या सुट्या भागांचा पूर्ण खर्च विमा कंपनीकडून मिळतो, खिशाला लागणारी कात्री वाचते.
गाडीच्या दुरुस्तीदरम्यान इंजिन ऑईल, लुब्रिकंटस्, नट-बोल्ट, स्क्रू आणि फिल्टर्स यांसारख्या ज्या वस्तू एकदा वापरून संपतात, त्यांचा खर्च साधारण क्लेममध्ये मिळत नाही. हे कव्हर घेतलेले असल्यास अशा लहान परंतु आवश्यक गोष्टींचा खर्चही विमा कंपनीकडून परत मिळतो.
हा पर्याय प्रामुख्याने नवीन गाड्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. पुरामुळे गाडीचे पूर्ण नुकसान झाले किंवा ती दुरुस्तीच्या पलीकडे गेली, तर सामान्यतः विमा कंपनी गाडीच्या घसार्यानुसार ठरवलेल्या मूल्याच्या (आयडीवी - इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू) आधारे पैसे देते. मात्र, रिटर्न टू इन्व्हॉईस कव्हर असेल, तर गाडी खरेदी करताना जितकी मूळ किंमत होती, त्यामध्ये असणारा रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्जेससह पूर्ण रक्कम परत मिळते.
हवामानातील वाढते बदल पाहता, विम्याचे नूतनीकरण करताना फक्त कमी प्रीमियमचा विचार न करता योग्य अॅड-ऑन्सची निवड करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.