Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स 300 अंकांनी वर; निफ्टी 23,700 च्या जवळ, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली असून सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली सुरुवात केली. आयटी, ऑटो आणि एनबीएफसी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी कायम राहिली असून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सेन्सेक्स ओपनिंगनंतर तब्बल 400 अंकांनी वाढून सुमारे 76,585 वर पोहचला.

तर निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 23,700 च्या वर पोहचला. बँक निफ्टीतही 110 अंकांची वाढ झाली. आजच्या सत्रात आयटी, ऑटो आणि एनबीएफसी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही प्रत्येकी सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली.

निफ्टी 50 मधील टॉप गेनर्समध्ये TCS, जिओ फायनान्स, विप्रो, इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, ट्रेंट, एचसीएल टेक, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स आणि इन्फोसिस यांचा समावेश होता. तर कोल इंडिया, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, सिप्ला, टाटा कंझ्युमर आणि कोटक बँक हे शेअर्स घसरले होते.

दरम्यान, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे बाजारात अनिश्चितता कायम आहे. मिडल ईस्टमध्ये वाढलेला तणाव, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली विक्री या गोष्टी बाजारासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) खरेदी कायम ठेवत बाजाराला आधार दिला आहे.

अमेरिकी बाजारातही सुरुवातीच्या वाढीनंतर नफा वसुली पाहायला मिळाली. डाओ जोन्स जवळपास 450 अंकांनी घसरल्यानंतर किरकोळ वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅकमध्ये 100 अंकांची वाढ झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकन फेडच्या धोरणात्मक निर्णयाकडे लागले आहे. GIFT निफ्टी सुमारे 50 अंकांनी वाढून 23,650 च्या आसपास ट्रेड करत होता, ज्यामुळे भारतीय बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले. डाओ फ्युचर्समध्येही वाढ दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग 13व्या दिवशी विक्री करत कॅश मार्केटमधून सुमारे 4,741 कोटी रुपयांची माघार घेतली. त्याउलट, DIIs ने सलग 15व्या दिवशी खरेदी करत 5,225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात स्थैर्य मिळालं. दरम्यान, सोन्या-चांदीच्या बाजारात मिश्र चित्र दिसलं. चांदीच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती सुमारे 2.53 लाख रुपयांवर आली, तर सोने किंचित वाढून सुमारे 1.56 लाख रुपयांवर पोहोचलं.

मिडल ईस्टमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल-इराण संघर्ष वाढत असून तेल टँकर आणि गॅस फील्डवर ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 3 टक्क्यांची वाढ होऊन त्या 103 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या, जे भारतासारख्या आयातदार देशांसाठी चिंतेचं कारण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT