Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी खाली, कोणते शेअर्स लाल रंगात?

Stock Market Today: बँक निफ्टीतही सुमारे 170 अंकांची घसरण दिसून आली. व्यापक बाजारातही विक्रीचा दबाव जाणवत होता आणि बहुतांश शेअर्स लाल रंगात होते.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी घसरून व्यवहार करत होता, तर निफ्टीत जवळपास 100 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीतही सुमारे 170 अंकांची घसरण दिसून आली. व्यापक बाजारातही विक्रीचा दबाव जाणवत होता आणि बहुतांश शेअर्स लाल रंगात होते.

कोणते शेअर्स घसरले?

सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, मेटल आणि बँकिंग क्षेत्रात विक्रीचा जोर अधिक होता. मात्र भारती एअरटेल, टाटा कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंट्स, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, टायटन आणि ग्रासिम या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याउलट अ‍ॅक्सिस बँक, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, टाटा स्टील, हिंदाल्को आणि जिओ फायनान्शियल हे शेअर्स घसरले होते.

मागील बंद भावांच्या तुलनेत सेन्सेक्स 188 अंकांनी घसरून 85,213 वर उघडला, तर निफ्टी 76 अंकांनी खाली येत 25,951 वर उघडला. बँक निफ्टीतही 176 अंकांची घसरण झाली. चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैशांनी घसरुन 90.79 प्रति डॉलरवर उघडला.

बाजार सुरू होण्यापूर्वी जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम दिसून येत होता. अमेरिकन बाजारातील घसरण, कच्च्या तेलाच्या किमतींतील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची सुरू असलेली विक्री यामुळे बाजारावर दबाव होता. त्याच वेळी देशांतर्गत पातळीवर आयपीओ, धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक आकडेवारी बाजाराची दिशा ठरवू शकतात.

अमेरिकन बाजारात काय परिस्थिती?

अमेरिकन बाजारात AIशी संबंधित शेअर्समध्ये सुरू असलेल्या विक्रीमुळे डाओ जोन्स दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 250 अंकांनी घसरला आणि अखेरीस लाल रंगात बंद झाला. नॅस्डॅक सुमारे 140 अंकांनी घसरून तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला, तर एस अँड पी 500 मध्येही घसरण झाली. येणाऱ्या रोजगारविषयक आकडेवारीपूर्वी डाओ फ्युचर्स जवळपास स्थिर व्यवहार करत होते.

आशियाई बाजारांमध्येही घसरण स्पष्ट दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे 500 अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टीही सुमारे 30 अंकांनी खाली येत 26,075 च्या आसपास व्यवहार करत होता, ज्यामुळे देशांतर्गत बाजारासाठी घसरणीचे संकेत मिळाले.

कमोडिटी बाजारातील हालचाली?

कमोडिटी बाजारात मात्र संमिश्र चित्र पाहायला मिळाले. पुरवठा वाढण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 1 टक्क्यांनी घसरून सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, 60 डॉलरच्या आसपास आल्या. दुसरीकडे सोने आणि चांदीत जोरदार तेजी दिसून आली. देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर सुमारे 1 लाख 35 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचून नवा उच्चांक गाठला, तर चांदी सुमारे 5,300 रुपयांनी वाढत 1 लाख 97 हजार 900 रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किमतींमध्ये सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली.

डॉलर निर्देशांक दहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरुन घसरत 98 च्या खाली आला आहे. बँकिंग प्रणालीतील तरलता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक आज 5 अब्ज डॉलरचे स्वॅप लिलाव आयोजित करणार आहे. या माध्यमातून तीन वर्षांसाठी तरलता उपलब्ध करून दिली जाणार असून, हा निर्णय रोख्यांच्या आणि बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग तेराव्या दिवशीही शेअर बाजारातून पैसा काढून घेतला. मंगळवारी त्यांनी रोख बाजारात सुमारे 1,468 कोटी रुपयांची विक्री केली. रोख, निर्देशांक आणि फ्युचर्स व्यवहार मिळून त्यांची एकूण निव्वळ विक्री सुमारे 3,300 कोटी रुपये होती. मात्र देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग 76व्या दिवशी खरेदी करत सुमारे 1,800 कोटी रुपये बाजारात गुंतवले, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.

महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी

देशांतर्गत घडामोडींमध्ये आज विमा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता असून, त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. बँकिंग क्षेत्रात आरबीएल बँकेच्या मुख्य वित्त अधिकारी पदाच्या राजीनाम्याची बातमीही चर्चेत आहे. याशिवाय जीएसटी 2.0 मुळे एफएमसीजी क्षेत्राला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर सीतापती यांच्या मते, शहरी भागातील मागणी सुधारत असून नववर्ष एफएमसीजी कंपन्यांसाठी सकारात्मक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT