

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर
रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्के कपात केली आहे. या कपातीमुळे आपल्या गृह कर्जाच्या किंवा वाहन अथवा इतर कर्जाच्या ईएमआयवर किती परिणाम होणार आहे, याची पडताळणी स्वत: केली पाहिजे. बँकेने व्याजदर कमी केल्यावर दर महिन्याचा ईएमआय/हप्ता कमी करावा, की आपल्या कर्जाचा कालावधी कमी करावा, असा प्रश्न कर्जदारांना पडतो. पण, कोणताही आर्थिक निर्णय घेत असताना या निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेऊन निर्णय घ्यायला हवा.
सध्या जागतिक स्तरावर अनेक देश आर्थिक संकटे झेलत आहेत; तर अनेक देशांत व्याजदर आणि महागाई झपाट्याने वाढत आहे. त्यांचा जीडीपी मात्र कमी होत आहे. पण, आपला भारत देश असा एकमेव देश आहे, जिथे आपली अर्थव्यवस्था सर्वाधिक दराने वेगाने वाढत आहे. महागाई मागील दहा वर्षांत नीचांकावर आली आहे. आणि अर्थ व्यवस्थेला चालना देणारी मुख्य बाब म्हणजे देशातील बँकांचे व्याजदर हे कमी होत आहेत. हीच खरी देशाच्या प्रगतीची लक्षणे आहेत.
मागील सहा महिन्यांपासून (अंदाजे जून 2025 पासून) आरबीआयने दोन वेळा रेपो दरात कपात केली आहे. जून 2025 मध्ये 50 बेसिस पॉईंटस् (0.50%) आणि दि. 5 डिसेंबर 2025 रोजी 25 बेसिस पॉईंटस् (0.25%) ने कपात केली आाहे. रेपो दर हा असा व्याज दर आहे, ज्यावर आरबीआय इतर बँकांना कर्जपुरवठा करते. या दरात कपात झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज हे स्वस्त होते, त्यामुळे सामान्यतः गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते कमी होण्याची अपेक्षा असते. आपले कर्ज कोणत्या प्रणालीमध्ये आहे, त्यावरून साधारणत: व्याज दर किती कमी होणार हे ठरते. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्दिग रेट बेस रेट (MCLR) अशा दोन प्रणाली आहेत. तुमचे कर्ज रेपो लिंक्ड प्रणालीत असेल तर व्याजात होणारे बदलाचे परिणाम पूर्णतः तत्परतेने मिळते. पण, जर तुमचे कर्ज MCLR बेस रेट प्रणालीत असेल तर बँका थोड्या कालावधीनंतर कमी प्रमाणात व्याजाचे दर बदल अंमलात आणतात. रेपो रेट एकूण 0.75% पैशांनी कमी झाले आहेत. अशा वेळी कदाचित 0.40% ते 0.60% पैसे व्याज कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो दरातील कपातीमुळे आपल्या गृह कर्जाच्या ईएमआयवर किती परिणाम होणार आहे, याची पडताळणी स्वत: केली पाहिजे. व्याजातील बदलामुळे आपण काय निर्णय घ्यावा, यासाठी भारतातील लाखो गृहकर्जधारकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. बँकेने व्याजदर कमी केल्यावर दर महिन्याचा ईएमआय/हप्ता कमी करावा, की आपल्या कर्जाचा कालावधी कमी करावा?
हा निर्णय दिसायला जरी छोटा असला तरी त्याचा भविष्यासाठी आर्थिक परिणाम खूप मोठा असतो. त्यामुळे रिझर्व्ह बँक जेव्हा रेपो रेट कमी करते, तेव्हा बँका गृहकर्जाचे व्याजदर कमी करतात. एकदा गृहकर्जावरील व्याजदर कमी झाले की, आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होतात, ते म्हणजे-
1) ईएमआय/हप्ता कमी करणे (कर्जाची मुदत जशीच्या तशी ठेवणे)
हा पर्याय निवडल्यास-तुमचा मासिक कर्जाचा हप्ता कमी होतो, त्याचबरोबर मासिक खर्चात बचत होते आणि कॅश फ्लो सुधारतो; पण कर्जाचा एकूण कालावधी बदलत नाही. त्यामुळे व्याजाची बचत मर्यादित होते. हा पर्याय त्यांच्यासाठी योग्य आहे, जे सध्या आपल्या नेहमीच्या ईएमआयने त्रस्त आहेत तसेच ज्यांना आपला मासिक खर्चाचा भार कमी करायचा आहे.
2) कर्जाची मुदत कमी करणे (हप्ता/ईएमआय तसाच ठेवणे)
आताचा हप्ता जेवढा आहे, तोच ठेवला तर व्याजाचा दर कमी झाल्याने त्यातील जास्त रक्कम थेट कर्जाच्या मूळ रकमेत (झीळपलळरिश्र) जाते. त्याचा परिणाम व्याजदर कमी झाल्यावर ईएमआय तसेच ठेवले तर पुढचे भरत असलेले हप्ते कमी होऊन आपले कर्ज कमी मुदतीत संपते.
आपले कर्ज लवकर पूर्ण होते हे आर्थिक द़ृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचे ठरते. कारण, कर्ज जितके कमी कालावधीचे, तितके कमी व्याज जाते. आपला कर्जाचा बोजा लवकर संपतो. त्यामुळे आपले आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळते. आपण भविष्यात भराव्या लागणार्या एकूण व्याजात मोठी बचत होते. त्यामुळे वरीलपैकी कोणता निर्णय घ्यावा, हा संभ्रम खालील उदाहरणावरून समजून घेऊन आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
कर्जाची रक्कम : 50,00,000/-
जुना व्याजदर : 9%
नवा व्याजदर : 8.40%
उरलेला कालावधी : 20 वर्षे
जुना ईएमआय - 44,986/-
पर्याय 1) ईएमआय कमी करणे
नवा ईएमआय = 43,075/-
मासिक बचत = 1911 /-
या पर्यायमध्ये निव्वळ मासिक बचत झाल्याने भविष्यातील एकूण हप्त्याची रक्कम 4.58 लाख रुपयांनी वाचणार आहे. वाचलेली रक्कम खर्च न करता तुम्ही दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंडातील इक्विटी योजनेत दर महिन्यासाठी ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक केली तर 1911 रु. दर महा प्रमाणे 20 वर्षांत 12% परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षांत एकूण गुंतवणूक 4.58 लाख रुपये तसेच त्यावरील परतावा 13.01 लाख रुपये मिळेल. असा एकूण 17.59 रु लाखांचा आपला मासिक बचतीतून फंड तयार होऊ शकतो.
पर्याय 2 : भविष्यातील कर्जाची मुदत कमी करणे
ईएमआय तसाच - 44,986 रु.
नवीन कर्ज कालावधी : 20 वर्षे
यात 20 वर्षे हप्ते भरावे लागणार होते, तिथे तुम्हाला 18.5 वर्षे हप्ते भरावे लागतील. त्यामुळे भविष्यातील 18 महिन्याचे हप्ते भरावे लागणार नाहीत. यात 8.09 लाख रु. इतकी रक्कम वाचणार आहे. अन् ही वाचणारी रक्कम तुम्ही कर्जाची मुदत संपल्यानंतर 18 महिन्यांसाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर 7% व्याजाने तुम्हाला 45,589 रु. व्याज मिळेल. 20 वर्षांच्या अखेरीस एकूण फायदा सुमारे 8.55 लाख रु. मिळेल.
म्हणजे ईएमआय कमी करून 4.58 लाखांचा फायदा होणार आहे. तर कर्जाची मुदत कमी करून 8.09 लाखांचा फायदा होणार आहे. जर तुम्ही ईएमआय कमी करून वाचलेली रक्कम योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर 20 वर्षांत 17.59 लाखांचा फायदा होईल.
मुदत कमी करून वाचलेली रक्कम 18 महिन्यांच्या शेवटी गुंतवणूक केली तर 20 वर्षे पूर्ण होतील तेव्हा 8.55 लाखांचा फायदा होईल. प्रथम दर्शनी मुदत कमी केली, ही बाब फायदेशीर दिसत असली तरी योग्य गुंतवणुकीचा निर्णय हा तुमचे आर्थिक भवितव्य उज्ज्वल घडवू शकतो.
कोणताही आर्थिक निर्णय घेत असताना या निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, हे आकडेमोड करून लक्षात घ्यावे. आजचा आर्थिक निर्णय हा प्रथम दर्शनी किरकोळ वाटत असला तरी भविष्यात त्याचा संपत्ती निर्मितीवर मोठा परिणाम दर्शवतो. यासाठी भावी आर्थिक नियोजन आणि भक्कम सकारात्मक आर्थिक परिणाम साधण्यासाठी आपल्यासोबत मात्र चांगला आर्थिक सल्लागार असायला हवा.