Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 107 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी सकारात्मक झाली असून निफ्टी 107 अंकांनी वाढत 25,678 वर उघडला. मागील आठवड्यात मोठी अस्थिरता दिसली असली तरी पॉवर आणि PSU शेअर्समध्ये तेजी होती.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी सकारात्मक झाली आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात निफ्टी 107 अंकांनी वाढत 25,678 वर उघडला, तर सेन्सेक्सही 92 अंकांच्या वाढीसह 82,906 वर पोहोचला. मागील आठवड्यातील मोठ्या चढ-उतारानंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे.

मागील आठवड्यात बाजारात प्रचंड वोलॅटिलिटी पाहायला मिळाली. संपूर्ण आठवड्यात निफ्टीने तब्बल 512 अंकांच्या रेंजमध्ये व्यवहार केला आणि अखेरीस आठवड्याच्या आधारावर 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 25,571 वर बंद झाला. शुक्रवारी निफ्टीमध्ये 117 अंकांची जोरदार तेजी होती. मिडकॅप निर्देशांकात 0.3 टक्क्यांची वाढ झाली, तर स्मॉलकॅप निर्देशांकात 0.3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

आज शेअर बाजारात एलअँडटी आणि एचडीएफसी लाइफ हे निफ्टीचे टॉप गेनर्स ठरले, या दोन्ही शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर इटरनल आणि टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स ठरले, ज्यामध्ये 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

दरम्यान, वीकेंडला जागतिक बाजारात खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडल्या. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की ट्रम्प यांना परस्पर (reciprocal) टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही, त्यामुळे आधी लागू केलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरले. मात्र या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी सर्व देशांवर पुढील 150 दिवसांसाठी 10 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली.

शनिवारी हा दर वाढवून 15 टक्के करण्यात आला असून, 24 फेब्रुवारीपासून हे नवे टॅरिफ लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सेक्शन 122 अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना आर्थिक संकट किंवा व्यापार तुटीच्या स्थितीत कमाल 15 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार आहे, मात्र पुढील 150 दिवसांत त्याला संसदेमधून मंजुरी घ्यावी लागते.

या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही जाणवत आहे. SBI Securities यांच्या मते, सध्या बाजारात वोलॅटिलिटी जास्त असून शेअर बाजाराची दिशा दिसत नाही. नजीकच्या काळात बाजार साइडवे पॅटर्नमध्ये व्यवहार करण्याची शक्यता आहे. निफ्टीसाठी 25,400 ते 25,350 हा महत्त्वाचा सपोर्ट मानला जात असून 25,850 ते 25,900 ही रेसिस्टन्सची पातळी आहे.

त्याचप्रमाणे HDFC Securities चे प्राइम रिसर्च प्रमुख देवांग वकील यांनी सांगितलं की तात्काळ आधारावर निफ्टीला 25,372 वर सपोर्ट मिळू शकतो, तर नजीकच्या काळात 25,885 च्या आसपास रेसिस्टन्स दिसू शकतो.

एकूणच, आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली असली तरी जागतिक घडामोडी, टॅरिफविषयक अनिश्चितता आणि सततची वोलॅटिलिटी पाहता गुंतवणूकदार सध्या सावध पावलं टाकत आहेत. पुढील काही दिवसांत जागतिक संकेत आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका बाजाराची दिशा ठरवण्यात निर्णायक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT