

Shivaji Maharaj Portrait Controversy Video: हरियाणातील सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमध्ये घडलेल्या प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मिलान बँक्वेट हॉलमध्ये पुरुष आणि महिलांच्या बाथरूमच्या ओळखीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या फोटोंचा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार समोर येताच नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा भारतीय इतिहास आणि अस्मितेचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्री परिसरातील मिलान बँक्वेट हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांच्या लक्षात आलं की बाथरूमच्या फलकांवर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चित्रं लावण्यात आली आहेत. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या बँक्वेट हॉलवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, न्याय आणि राष्ट्राभिमानाचं प्रतीक मानले जातात, तर महाराणी पद्मिनी यांचं नाव त्याग, स्वाभिमान आणि पराक्रमाशी जोडलं जातं. अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या फोटोंचा वापर चुकीच्या ठिकाणी करणं केवळ असंवेदनशील नाही, तर सांस्कृतिक वारशांचा अपमान असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
या प्रकरणानंतर काही संघटनांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रतिमांचा वापर करण्याआधी किमान संवेदनशीलता असायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेबाबत हॉल प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.