Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक; निफ्टी 135 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज वाढ दिसून आली. निफ्टी 135 अंकांनी वाढून 24,615 वर तर सेन्सेक्स 414 अंकांनी वाढून 79,530 वर उघडला.

Rahul Shelke

Stock Market Today: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले. बाजारात सकारात्मक वातावरण दिसत असून निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वाढीसह उघडले.

आजच्या सत्रात निफ्टी 135 अंकांनी वाढून 24,615 वर उघडला, तर सेन्सेक्स 414 अंकांनी वाढून 79,530 च्या पातळीवर सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात असलेली नकारात्मकता काही प्रमाणात कमी झाल्याचे संकेत या वाढीतून मिळत आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये खरेदी

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो, मेटल, फार्मा, पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्रात चांगली तेजी दिसून आली. या निर्देशांकांमध्ये सुमारे 1 ते 1.75 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र आयटी आणि एफएमसीजी निर्देशांकात काही प्रमाणात दबाव दिसून आला. सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांपैकी 20 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर 10 शेअर्स घसरणीसह दिसून आले.

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात रिलायन्स, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. दुसरीकडे एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण झाली.

रुपयातही सुधारणा

शेअर बाजारासोबतच रुपयातही आज तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 57 पैशांनी मजबूत होत 91.57 च्या पातळीवर उघडला.

काल बाजारात मोठी घसरण

यापूर्वी बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. निफ्टीने दिवसभरात 24,305 ची नीचांकी पातळी गाठली होती. अखेरीस निफ्टी 385 अंकांनी घसरून 24,480 वर बंद झाला होता.

बाजारासाठी सकारात्मक संकेत

तज्ज्ञांच्या मते काही घटकांमुळे बाजाराला आधार मिळत आहे. अमेरिकन शेअर बाजारात झालेली रिकव्हरी, देशांतर्गत फंडांची मोठी खरेदी आणि निफ्टीने 24,300 च्या पातळीवर घेतलेला सपोर्ट हे बाजारासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत.

शेअर बाजारावर दबाव टाकणारे घटक

काही नकारात्मक घटकही बाजारावर दबाव टाकत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी विक्री सुरू आहे. रुपया यापूर्वी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

याशिवाय कच्च्या तेलाच्या किंमती 83 डॉलरच्या आसपास टिकून आहेत. तसेच मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आणि बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच VIX मध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अजूनही सावध वातावरण आहे.

दरम्यान, मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अजूनही घसरण दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात वाढ झाली असली तरी गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT