Stock Market Today: इराण-इस्रायल तणावामुळे शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 1,600 अंकांनी कोसळला, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Today: इराण-इस्रायल तणावामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला आहे. निफ्टी 24,400 च्या खाली व्यवहार करत असून आयटी क्षेत्र वगळता सर्व सेक्टर लाल रंगात आहेत.
Stock Market
Stock MarketPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आणि इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणावर घसरले.

सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 1,640 अंकांनी घसरत 78,599 वर उघडला, तर निफ्टी जवळपास 490 अंकांनी घसरून 24,375 वर व्यवहार करत होता. पुढे सुरुवातीच्या सत्रात निफ्टीमध्ये 500 हून अधिक अंकांची घसरण झाली आणि तो 24,400 च्या खाली घसरला.

बहुतांश सेक्टर लाल रंगात

आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्र वगळता जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरलेले दिसत आहेत. विशेषतः ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल्टी, मेटल, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली.

सेन्सेक्समधील टॉप-30 कंपन्यांपैकी 27 शेअर्स घसरलेले होते. दुसरीकडे आयटी क्षेत्रातील काही शेअर्समध्ये मात्र तेजी दिसली. इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएल टेक या शेअर्समध्ये सुमारे दीड टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. तर एल अँड टी, टाटा स्टील, इंडिगो आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. काही शेअर्समध्ये सहा टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी सल्ला

बाजारातील या अस्थिरतेबाबत मार्केट तज्ज्ञांनी ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते सध्या बाजारात मोठी अस्थिरता (Volatility) दिसत आहे. त्यामुळे सध्या जास्त नफा कमावण्यापेक्षा भांडवल सुरक्षित ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे.

Stock Market
Israel Iran Conflict: त्यांनी माझी हत्या करण्यापूर्वीच मी त्यांना संपवले

ट्रेडर्सनी स्टॉपलॉसचा काटेकोरपणे वापर करावा. पहिला स्टॉपलॉस लागल्यावर लगेच पोझिशन कमी करणे फायद्याचे आहे. इंट्राडे किंवा ओव्हरनाइट पोझिशन्स कमी ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांनी घाबरून वारंवार पोर्टफोलिओ तपासण्याऐवजी संयम बाळगावा. अनेक वेळा युद्धासारख्या परिस्थितीनंतर बाजार पुन्हा सावरतो आणि नव्या उच्चांकावर पोहोचतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी शांत राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक बाजारातही मोठी घसरण

भारतीय बाजारावर जागतिक बाजारातील घसरणीचाही परिणाम दिसत आहे. अमेरिकेतील बाजारात डाऊ जोन्स सुमारे 0.83 टक्क्यांनी घसरला, तर टेक-हॅवी नॅस्डॅक जवळपास 1 टक्क्यांनी खाली आला.

जपानचा निक्केई 225 निर्देशांकही मोठ्या प्रमाणावर घसरला असून त्यात सुमारे 1850 अंकांची म्हणजेच 3.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. एकूणच जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

Stock Market
Who is Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनेई कोण आहेत? पत्नी, मुले आणि संपत्ती… इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल जाणून घ्या

इराण संकटामुळे ऊर्जा बाजारात तणाव

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे ऊर्जा बाजारावरही दबाव वाढला आहे. कच्च्या तेलाची किंमत 82 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. इराणने होर्मूज सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याशिवाय कतारनेही गॅस उत्पादन तात्पुरते बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव वाढला आहे.

विश्लेषकांच्या मते, जर हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news