Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; कोणत्या सेक्टरमध्ये तेजी?

Stock Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात झाली असून सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला. बँक निफ्टीत 500 अंकांची जोरदार वाढ झाली, मात्र IT शेअर्समध्ये विक्री दिसली.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात BSE Sensex सुमारे 400 अंकांनी वाढला, तर बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आल्याने बँक निफ्टीत तब्बल 500 अंकांची वाढ झाली. मात्र दुसरीकडे आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव कायम असल्याचे चित्र दिसले.

जागतिक स्तरावर मिळालेले संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा होणार असल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायल आणि लेबनानमध्येही युद्धविरामाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे मिडल ईस्टमधील तणाव कमी होऊ शकतो आणि बाजाराला काहीसा दिलासा मिळू शकतो.

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्याने चिंता कायम आहे. ब्रेंट क्रूड सुमारे 2 टक्क्यांनी वाढून 97 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले आहे. हॉर्मुज सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीसाठी अजूनही इराणच्या परवानगीची गरज असल्याने पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

अमेरिकन बाजारांनी मात्र मजबूत कामगिरी केली. Dow Jones Industrial Average 275 अंकांनी वाढला, तर नॅस्डॅकही सुमारे 200 अंकांनी वधारला. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा वाढलेला दिसतो.

दरम्यान, GIFT Nifty सुमारे 60 अंकांनी वधारून 23,940 च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील महागाई (CPI) आकडेवारीकडे लागले आहे, ज्याचा बाजारावर परिणाम होऊ शकतो.

भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराबाबतही सकारात्मक संकेत मिळत आहेत. या महिन्यात भारतीय प्रतिनिधीमंडळ वॉशिंग्टनला भेट देणार असल्याने दोन्ही देशांतील व्यापार संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) सुमारे 1920 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 29व्या दिवशी 956 कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला आधार दिला आहे.

दरम्यान, सोन्या-चांदीच्या किंमतींमध्येही मोठी वाढ दिसून आली. सोने 1650 रुपयांनी वाढून 1,53,500 च्या जवळ पोहोचले, तर चांदी 3850 रुपयांनी वाढून 2,43,750 च्या वर बंद झाली.

आयटी सेक्टरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते TCS च्या निकालांनी. कंपनीने चौथ्या तिमाहीत मजबूत कामगिरी केली असून भविष्यातील डील पाइपलाइनही मजबूत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आयटी शेअर्समध्ये हालचाल वाढण्याची शक्यता आहे.

एकूणच, बँकिंग शेअर्सच्या जोरावर बाजाराने दमदार सुरुवात केली असली, तरी जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किंमती आणि आयटी सेक्टरवरील दबाव यामुळे पुढील वाटचाल सावधपणे होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT