

EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निधी (PF) संदर्भात वारंवार होणाऱ्या तक्रारी, क्लेम सेटलमेंटला लागणारा वेळ, जास्त कागदपत्रे आणि कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज, या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Employees' Provident Fund Organisation (EPFO) लवकरच ‘EPFO 3.0’ ही नवी डिजिटल प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. या अपडेटमुळे PF सेवांचा वापर अधिक सोपा, जलद आणि पारदर्शक होणार आहे.
EPFO 3.0 अंतर्गत सर्वात मोठा बदल म्हणजे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया. आता अनेक विड्रॉल क्लेम्स ऑटोमॅटिक पद्धतीने मंजूर केले जात आहेत. याची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी अर्ज केल्यानंतर कमी वेळात पैसे खात्यात मिळण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर मॅन्युअल प्रक्रियेवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.
याचबरोबर, नोकरी बदलताना PF ट्रान्सफर करण्यापूर्वी लागणारी कंपनीची मंजुरी ही मोठी अडचण ठरत होती. आता KYC पूर्ण असलेल्या खात्यांसाठी ट्रान्सफर प्रक्रिया ऑटोमॅटिक केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी सहजपणे आपला PF एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतील.
डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक मोठी भर म्हणजे UPI द्वारे PF विड्रॉलची सुविधा. EPFO यावर काम करत असून, ही सुविधा सुरू झाल्यानंतर PF मधील पैसे थेट आणि जलदगतीने बँक खात्यात जमा होतील. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे.
याशिवाय, एक नवीन मोबाइल अॅप आणण्याचीही तयारी सुरू आहे. या अॅपच्या माध्यमातून क्लेम फाइल करणे, त्याची स्थिती ट्रॅक करणे आणि विड्रॉल करणे अशा सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रांची गरज लागणार नाही.
EPFO 3.0 मध्ये पेन्शन व्यवस्थेतही बदल केले जात आहेत. युनिफाइड पेन्शन पेमेंट सिस्टम आधीच लागू करण्यात आली असून, यामुळे देशभरातील लाभार्थ्यांना पेन्शन वेळेवर आणि एकसमान पद्धतीने मिळणार आहे.