Stock Market Today: शेअर बाजारात आजपासून जानेवारी सिरीजची सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी बाजार तेजीसह उघडला. सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीत 80 अंकांची तेजी पाहायला मिळाली. बँक निफ्टीही जवळपास 140 अंकांनी वर होता. विशेष म्हणजे, मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये आजही तेजी कायम आहे.
आज बाजार उघडण्यापूर्वी जागतिक संकेत फारसे चांगले नव्हते. GIFT निफ्टी 26,125 च्या आसपास सपाट व्यवहार करत होता. अमेरिकेतील डाओ फ्युचर्स सुमारे 50 अंकांनी घसरले, त्यामुळे जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत होते.
वॉल स्ट्रीटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. डाओ जोंस सुमारे 100 अंकांनी घसरणीसह बंद झाला, तर नॅस्डॅकमध्येही 55 अंकांची घसरण झाली. वाढते बाँड यिल्ड्स आणि जागतिक आर्थिक वाढीबाबतच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून आले.
कमोडिटी बाजारात आज चांदी चर्चेत आहे. देशांतर्गत बाजारात चांदी 26,600 रुपयांनी वाढून 2 लाख 51 हजार रुपयांच्या वर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीत जोरदार खरेदी झाली असून, भाव 8 टक्क्यांनी वाढून 76 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेले.
सोनेही तेजीत आहे. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 1,700 रुपयांनी वाढले, तर जागतिक बाजारात सोने 4,350 डॉलरच्या आसपास स्थिर व्यवहार करत होते. दुसरीकडे, कच्चे तेल सुस्त असून ब्रेंट क्रूड 61 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर आहे.
मेटल क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. LME कॉपरने सलग सहाव्या दिवशी नवा उच्चांक गाठला. अॅल्युमिनियमचे दर साडेतीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले, तर निकेलमध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली. औद्योगिक मागणी आणि पुरवठ्याच्या चिंतेमुळे मेटल्सच्या किंमती वाढत आहेत.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग सहाव्या दिवशी विक्री करत 3,844 कोटी रुपये बाजारातून काढले. डेरिव्हेटिव्ह विभागातही किरकोळ विक्री झाली. मात्र, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) आपला विश्वास कायम ठेवत सलग 86व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली. एका दिवसातच 6,160 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने बाजाराला आधार मिळाला.
आजपासून F&O सेगमेंटमध्ये Bajaj Holdings, Premier Energy, Swiggy आणि Waaree Energies या कंपन्यांचा समावेश झाला आहे. तसेच बँक निफ्टीमध्ये Yes Bank आणि Union Bank यांची एन्ट्री झाली आहे.
आज डिफेन्स क्षेत्रातील शेअर्स फोकसमध्ये राहणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने 4,666 कोटी रुपयांचे संरक्षण करार जाहीर केले आहेत. यामध्ये Bharat Forge ला 1,661 कोटी रुपयांचा बॅटल कार्बाइनचे कॉन्ट्र्रॅक मिळाले आहे. या घडामोडीमुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.
आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अर्थतज्ज्ञांसोबत बैठक घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारताला आंतरराष्ट्रीय बाजाराचे केंद्र बनवण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत.