

Stock Market Today: मंथली एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात झाली. जागतिक बाजारांमधील नकारात्मक संकेतांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 120 ते 150 अंकांनी घसरून 84,500 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 40 अंकांनी घसरून 25,900 च्या आसपास दिसत होता.
आज देशांतर्गत बाजारात मंथली एक्सपायरीमुळे चढ-उतार वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डिसेंबर सिरीजचा शेवट होऊन नव्या वर्षासाठी नवीन सिरीजला सुरुवात होत आहे. मात्र याआधीच जागतिक बाजारांकडून येणारे संकेत कमकुवत असल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
अमेरिकन बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. डाओ जोन्स सुमारे 250 अंकांनी घसरून बंद झाला, तर एआय शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे नॅस्डॅक सुमारे 120 अंकांनी घसरला. आज जाहीर होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिट्सपूर्वी गुंतवणूकदार मोठे निर्णय घेण्याचे टाळत आहेत. त्यामुळे डाओ फ्युचर्स सपाट, तर आशियाई बाजारही सुस्त दिसत आहे.
जागतिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर GIFT निफ्टी सुमारे 25,950 च्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात मर्यादित चढ-उतारांसह व्यवहार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेड मिनिट्सआधी बाजारातील व्यवहारांचे प्रमाण कमी होऊ शकते.
विक्रम पातळी गाठल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाली आहे. देशांतर्गत बाजारात चांदी आपल्या लाइफ हाईवरून सुमारे 30 हजार रुपयांनी घसरून 2.24 लाख रुपयांच्या खाली बंद झाली. सोनेही ऑल टाइम हाईवरून 5,600 रुपयांनी घसरून 1.35 लाख रुपयांच्या खाली आले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी सुमारे 12 टक्क्यांनी कोसळली, तर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.
शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच आहे. FIIsने कॅश मार्केटमध्ये सलग पाचव्या दिवशी सुमारे 2,760 कोटी रुपयांची विक्री केली. कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून एकूण सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. याउलट DIIs चा बाजारावरचा विश्वास कायम असून त्यांनी सलग 85व्या दिवशी सुमारे 2,644 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळत आहे.