Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आजही शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी, तर निफ्टी जवळपास 45–50 अंकांनी घसरणीसह उघडला. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 67 अंकांच्या घसरणीसह 84,491च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी 14 अंकांनी घसरून 25,802 वर होता. बँक निफ्टीही 41 अंकांनी घसरून 58,883 या स्तरावर दिसला.
बाजारात एकूण दबाव असला तरी आयटी आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आयटी इंडेक्स तब्बल 1 टक्क्यांहून अधिक वाढला. निफ्टी 50 मधील Wipro, Infosys, HCL Tech, TCS, Tech Mahindra, Shriram Finance आणि Indigo हे शेअर्स टॉप गेनर्समध्ये होते. दुसरीकडे ऑटो, फार्मा आणि रियल्टी सेक्टरमध्ये घसरण झाली. Sun Pharma, M&M, Bajaj Auto, NTPC, Maruti, Eicher Motors, BEL आणि L&T हे शेअर्स टॉप लूजर्समध्ये होते.
जागतिक बाजारांकडूनही कमकुवत संकेत मिळत आहेत. अमेरिकन बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. AI आणि टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्यामुळे नॅस्डॅक सुमारे 420 अंकांनी कोसळला, तर डाओ जोन्सही मोठ्या घसरणीसह बंद झाला.
या दबावाचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. बहुतेक आशियाई निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. GIFT निफ्टी सुमारे 25 अंकांनी घसरून 25,875 च्या आसपास होता, ज्यामुळे देशांतर्गत बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात सलग 14 दिवसांच्या विक्रीनंतर काल सुमारे 1,172 कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र डेरिव्हेटिव्ह पोझिशन्समुळे एकूण व्यवहारात फारसा फरक पडला नाही. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) मात्र सलग 78व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत सुमारे 769 कोटी रुपये गुंतवले, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
कमोडिटी बाजारात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. चांदीने देशांतर्गत बाजारात जवळपास 10,000 रुपयांची वाढ घेत 2,07,833 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी 5 टक्क्यांहून अधिक वाढून 67 डॉलरच्या वर पोहोचली.
सोनेही सुमारे 500 रुपयांनी वाढून 1,34,900 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते.
कच्च्या तेलाच्या किमती 5 वर्षांच्या नीचांकी पातळीवरून सावरत 60 डॉलरच्या वर गेल्या.
सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर आज रुपयात थोडी स्थिरता दिसली. बाजारातील तरलता वाढवण्यासाठी RBI आज 50,000 कोटी रुपयांचे OMO (ओपन मार्केट ऑपरेशन) करणार असून, त्याअंतर्गत सरकारी बाँड्सची खरेदी केली जाणार आहे. यामुळे बाँड यिल्डवरचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे.