Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी बाजार लाल रंगात; सेंसेक्स 84,987 वर उघडला, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Today India: भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशीही घसरण झाली आणि निफ्टी 25,981 तर सेंसेक्स 84,987 वर लाल रंगात उघडला. रुपया डॉलरसमोर आणखी घसरत 90.41च्या पातळीवर पोहोचला आहे.

Rahul Shelke

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. आज निफ्टी केवळ चार अंकांच्या किरकोळ घसरणीसह 25,981 वर उघडला, तर सेंसेक्सनेही नकारात्मक सुरुवात केली आणि 119 अंकांच्या घसरणीसह 84,987 वर उघडला. बाजारात सुरुवातीपासूनच निगेटिव्ह सेंटिमेंट दिसून आले.

आज डॉलरसमोर रुपया आणखी घसरला आहे आणि तो 90.41 वर उघडला. काल रुपया 90.19 वर बंद झाला होता. त्यामुळे रुपयातील घसरणीचा ट्रेंड अजूनही कायम आहे.

कालही बाजाराचा मूड निगेटिव्ह होता. निफ्टी 46 अंकांनी घसरत 25,986 वर बंद झाला होता. सध्या बाजारातील या सततच्या घसरणीमागे दोन मुख्य कारणं असल्याच तज्ज्ञांच मत आहे. पहिलं कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री. दुसरं कारण म्हणजे रुपया कमकुवत होत असल्याने भारताची अर्थव्यवस्था संकटात असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

कच्च्या मालातील चढ-उतार, जागतिक संकेत आणि डॉलरची तेजी हे घटकही बाजारावर परिणाम करताना दिसत आहेत. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहेत आणि बाजारात मोठे व्यवहार होताना दिसत नाहीत. पुढील काही सत्रांमध्ये रुपयावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

कोणते शेअर्स वाढले?

बाजारात सुरुवातीच्या तासात आयटी, मेटल आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसली, मात्र फार्मा शेअर्सवर दबाव कायम होता. सकाळी 9:45 वाजेपर्यंत टीसीएसचा शेअर सर्वाधिक तेजीत होता. कंपनीचा शेअर 1.39 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. त्यानंतर एचसीएल टेकमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ, तर टेक महिंद्राच्या शेअरमध्ये 0.99 टक्क्यांची वाढ झाली. एशियन पेंट्समध्येही 0.89 टक्क्यांची वाढ झाली होती, तर इन्फोसिसचा शेअर 0.57 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.

कोणते शेअर्स घसरले?

दुसरीकडे काही शेअर्सवर प्रेशर कायम आहे. इटरनलचा शेअर 1.43 टक्क्यांनी घसरला, तर अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.55 टक्क्यांची घसरण झाली. पावर ग्रिड 0.50 टक्क्यांनी घसरला, तर एसबीआयचा शेअर 0.41 टक्क्यांनी घसरला. ट्रेंटमध्येही 0.37 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

बाजारातील मिश्र संकेत आणि सेक्टरनिहाय अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रांमध्ये ग्लोबल ट्रेंड आणि FIIच्या हालचाली बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT