

Haryana killer mom case child murders panipat poonam arrest:
पानिपत : हरियाणातील पानिपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानिपत पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करताना चार मुलांचे खून उघडकीस आणले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेने स्वत:च्या मुलाचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 34 वर्षीय पूनमला अटक केली आहे.
1 डिसेंबर रोजी नौल्था गावात एका लग्नसमारंभादरम्यान सहा वर्षांची विधी नावाची मुलगी गायब झाली. शोधाशोध सुरू असताना पहाटे तिची आजी जेव्हा पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गेली, तेव्हा दरवाजा बाहेरून बंद होता. आत गेल्यावर विधी प्लास्टिकच्या टबमध्ये उलटी पडलेली दिसली. तिचं फक्त डोकं पाण्यात होतं. तिला तातडीने इसराणा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोस्टमार्टेममध्ये मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली. विधीची मावशी पूनमशी बोलताना तिच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळली आणि पोलिसांना तिच्यावर संशय आला. चौकशीत पूनमने केवळ विधी नव्हे तर इतर तीन मुलांचेही खून केल्याची कबुली दिली. चारही मुलांना तिने पाण्याच्या टबमध्ये बुडवून एकाच पद्धतीने मारले आहे. चौकशीत पूनमने दिलेली माहिती ऐकून पोलीसही हादरले आहेत.
'माझ्यापेक्षा सुंदर कोणी नसावं'
पूनमला सतत असं वाटायचं की तिच्यापेक्षा सुंद कोणी नसावं. यातूनच पूनमने लहान मुलांची हत्या केली. पूनमला मानसिक आजार आहे का या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पहिली हत्या 2023 मध्ये
पूनमचा विवाह 2019 मध्ये झाला. पहिला खून जानेवारी 2023 मध्ये झाला, जेव्हा तिने आपल्या नंदेची नऊ वर्षांची मुलगी, ईशिकाला, घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून मारले. त्यानंतर काही महिन्यांनी तिने स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलाला शुभमला ठार केलं. कारण शुभमने ईशिकाची हत्या करताना आईला बघितलं होतं. दुर्दैवाने दोन्ही मृत्यूंना त्या वेळी कुटुंबीयांनी अपघात समजलं.
या वर्षी ऑगस्टमध्ये तिने आपल्या चुलत बहिणीची सहा वर्षांची मुलगी जिया हिचाही अशाच पद्धतीने बळी घेतला. हा मृत्यूही अपघात म्हणूनच नोंदवला गेला. आणि आता शेवटी नौल्थात विधीचा मृतदेह सापडल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पूनमचा पती शेतकरी असून त्यांना अजून एक चार वर्षांचा मुलगा आहे. आरोपीला मंगळवारी अटक झाली असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 1 डिसेंबररोजी विधीचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वात आधी तिचे आजोबा पाल सिंह यांना संशय आला. पाल सिंह हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी विधीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितल्यानेच पानिपत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पूनमचे बिंग फुटले.