Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी वाढून 84,337च्या आसपास व्यवहार करत होता. तर निफ्टी 45 अंकांच्या वाढीसह 25,922च्या पातळीवर पोहोचला.
बँक निफ्टीमध्ये मात्र फारशी हालचाल दिसली नाही. प्रमुख शेअर्समध्ये ONGC, BEL, Asian Paints, Power Grid, HCL Tech, Tech Mahindra यांसारख्या शेअर्समध्ये चांगली खरेदी पाहायला मिळाली. दुसरीकडे Adani Enterprises, Adani Ports, ICICI Bank, Shriram Finance, NTPC आणि Max Healthcare या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली. दरम्यान, Vodafone Ideaचा शेअर सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे.
देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर अनेक घडामोडी बाजाराच्या दिशेवर परिणाम करत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, अमेरिकन बाजारांकडून मिळालेले संमिश्र संकेत, कमोडिटी बाजारातील चढ-उतार आणि आयपीओ, या सगळ्यांवर गुंतवणूकदारांची नजर आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारीही विक्रीचा सपाटा लावला. त्यांनी सुमारे 11,922 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. सलग चौथ्या दिवशी एफआयआय बाजारातून पैसा काढताना दिसले. मात्र, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) विश्वास कायम ठेवत सलग 93व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली. त्यांनी जवळपास 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यामुळे बाजारातील घसरण काही प्रमाणात कमी झाली.
अमेरिकन बाजारांकडून संमिश्र संकेत मिळाले. Dow Jones निर्देशांक सुमारे 270 अंकांच्या वाढीसह बंद झाला. मात्र, सलग तीन दिवसांच्या तेजी नंतर Nasdaqमध्ये सुमारे 100 अंकांची घसरण पाहायला मिळाली. Gift Nifty 26,000 च्या आसपास सपाट व्यवहार करत असल्याने भारतीय बाजारात मर्यादित चढ-उताराची शक्यता वर्तवली जात आहे.
कमोडिटी बाजारात प्रॉफिट बुकिंगचा दबाव दिसून आला. चांदी सुमारे 8,200 रुपयांनी घसरून 2,43,300 रुपयांच्या आसपास बंद झाली, तर सोन्याच्या दरात सुमारे 300 रुपयांची घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीत सव्वा टक्का घसरण झाली असली तरी सोन्याच्या किमतींमध्ये थोडी तेजी दिसली. दुसरीकडे, अमेरिकेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाल्यामुळे ब्रेंट क्रूड सुमारे साडेचार टक्क्यांनी वाढून 63 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले.
कॉर्पोरेट क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. Bajaj Finserv आणि Allianz यांची 24 वर्षांची भागीदारी संपुष्टात आली आहे. बजाज फिनसर्व्हने आपल्या विमा कंपन्यांमधील Allianz ची 23 टक्के हिस्सेदारी सुमारे 21,400 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ही भारतीय विमा क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील मानली जात आहे.
एफ अँड ओ सेगमेंटमध्ये IREDAच्या निकालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल, जे बाजार बंद झाल्यानंतर जाहीर होणार आहेत. तसेच इलेक्ट्रिसिटी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये मार्केट कपलिंग प्रकरणावर आज सुनावणी होणार असून, त्याचा परिणाम IEX शेअरवर दिसू शकतो.
एकूणच, शेअर बाजारात आज सावध पण सकारात्मक सुरुवात झाली असून, पुढील दिशा जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या हालचालींवर अवलंबून राहणार आहे.