

पुणे : पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथे ८ जानेवारी २०२६ रोजी मयूर पवार (वय ३१ वर्षे) या नागरी कर्मचाऱ्याच्या अनैसर्गिक मृत्यूची झाल्याची घटना घडली.त्यांच्या खिशात कर्जबाजारी झाल्याने जीवन संपवत असल्याची चिठ्ठी सापडली आहे.
सायंकाळ ५.४५ वाजता, कॅडेट ऑर्डरली म्हणून कार्यरत असलेले पवार हे एका फर्निचरच्या गोदामात अचेतन अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
पवार हे मल्टी-टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत होते.त्यांनी सुमारे ११ वर्षे सेवा केली. ते लामणवाडी, खडकवासला, पुणे येथील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळी ते स्क्वाड्रनमध्ये कर्तव्यावर होते.
उत्तम नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास हाती घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे हलवण्यात आला आहे.
पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात मृत व्यक्ती आर्थिक तणावाखाली असल्याचे आणि या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट आणि सर्व कर्मचारी या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबासोबत आहेत आणि ते कुटुंब तसेच नागरी अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहेत.अशी माहिती अंकुश चव्हाण,जनसंपर्क अधिकारी, संरक्षण, पुणे यांनी गुरुवारी रात्री कळवली आहे.