Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढले. सेन्सेक्स 216 अंकांच्या वाढीसह 85,145 वर उघडला, तर निफ्टी 89 अंकांनी वाढून 26,055 च्या वर पोहोचला. बँक निफ्टीही 155 अंकांनी वाढून 59,224 वर व्यवहार करताना दिसला.
आजच्या तेजीमध्ये आयटी शेअर्स आघाडीवर राहिले. आयटी निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. निफ्टी 50 मधील Shriram Finance, Infosys, Hindalco, Tata Steel, Wipro, Tech Mahindra आणि Grasim या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. मात्र SBI Life, M&M, Ultratech Cement आणि Power Grid या शेअर्समध्ये घसरण झाली.
शुक्रवारी परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराचा मूड आधीच सकारात्मक होता. त्यातच अमेरिकेतील टेक शेअर्समधील तेजी आणि कमोडिटी मार्केटमधील विक्रमी हालचालींनी बाजाराला आधार दिला.
शुक्रवारी Infosys च्या American Depositary Receipt (ADR) मध्ये हालचाल पाहायला मिळाली. एका टप्प्यावर ADR तब्बल 57 टक्क्यांनी वधारला, ज्यामुळे ट्रेडिंग दोन वेळा थांबवण्यात आले. मात्र व्यवहाराच्या शेवटी हा शेअर सुमारे 5 टक्के वाढीसह बंद झाला. कंपनीकडून या हालचालीमागे कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा घोषणा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, त्यामुळे बाजारात चर्चेला उधाण आले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात खरेदी कायम ठेवली. शुक्रवारी कॅश मार्केट, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून FIIs नी सुमारे 6,744 कोटी रुपयांची खरेदी केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही सलग 80व्या दिवशी बाजारात सुमारे 5,700 कोटी रुपये गुंतवले. हा फंड फ्लो बाजारासाठी सकारात्मक मानला जात आहे.
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळाले. GIFT निफ्टी सुमारे 150 अंकांच्या वाढीसह 26,180 च्या आसपास ट्रेड होत होता. अमेरिकन बाजारात टेक शेअर्समधील तेजी कायम राहिली. नॅस्डॅक शुक्रवारी सुमारे 300 अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, तर डाओ जोन्समध्ये 180 अंकांची वाढ झाली.
कमोडिटी बाजारातही मोठी हालचाल दिसली. चांदीने जवळपास 5,000 रुपयांची झेप घेत 2,08,603 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम केला. सोन्यात मात्र थोडी घसरण दिसली आणि दर सुमारे 300 रुपयांनी घसरून 1,34,200 रुपयांच्या आसपास बंद झाले. कच्चे तेल 61 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ स्थिर राहिले. बेस मेटल्समध्येही तेजी दिसली. अॅल्युमिनियम साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला, तर झिंक, लेड आणि निकेलमध्येही दीड टक्क्यांपर्यंत वाढ झाली.