

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 330 अंकांनी वाढून 84,900 च्या आसपास पोहोचला. निफ्टीतही सुमारे 100 अंकांची वाढ झाली असून तो 25,900 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही तेजी दिसून आली आणि तो 59,000 च्या वर व्यवहार करत होता.
परदेशी गुंतवणूकदारांमुळे आज बाजारात तेजी दिसून येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग दुसऱ्या दिवशी कॅश मार्केटमध्ये सुमारे 600 कोटी रुपयांची खरेदी केली. डेरिव्हेटिव्ह व्यवहारसह त्यांची एकूण खरेदी जवळपास 2,700 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 79व्या दिवशी खरेदी करत सुमारे 2,700 कोटी रुपये बाजारात गुंतवले.
अमेरिकेत महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आल्याने तिथल्या बाजारातही सुधारणा झाली. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर डाओ जोन्स निर्देशांक वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅकमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर 2.7 टक्के राहिला, जो अंदाजापेक्षा कमी आहे. यामुळे व्याजदर वाढीची भीती कमी झाली असून जागतिक बाजाराला दिलासा मिळाला आहे.
GIFT निफ्टीतही सुमारे 70 अंकांची वाढ दिसून आली. जपानच्या मध्यवर्ती बँकेच्या धोरणापूर्वी जपानचा निक्केई निर्देशांक वाढला असून आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. याचा थेट फायदा भारतीय बाजाराला होताना दिसत आहे.
सोन्याने देशांतर्गत बाजारात नवा उच्चांक गाठला असून दर 1 लाख 35 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, चांदीमध्ये मोठी घसरण झाली असून प्रॉफिट बुकिंगमुळे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 60 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिर आहेत.
आज ICICI Prudential AMC च्या IPO ची शेअर बाजारात लिस्टिंग होत आहे. या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता लिस्टिंगमध्ये किती फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जागतिक IT कंपनी Accenture ने चांगले निकाल जाहीर केल्याने IT क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा Infosys, TCS, Wiproसारख्या देशांतर्गत IT शेअर्सना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज IT शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळू शकते.