Silver Hits Record High Pudhari
अर्थभान

Silver Hits Record High: वर्ष संपण्यापूर्वीच चांदीने रचला इतिहास; किंमत 2.50 लाख रुपयांच्या वर, भाव वाढीचे कारण काय?

Silver Price Today: वर्ष संपण्याआधीच चांदीच्या भावांनी नवा इतिहास रचला आहे. देशातील वायदा बाजारात चांदी प्रथमच 2.5 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. औद्योगिक मागणी, जागतिक तणाव आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे भाव वाढत आहेत.

Rahul Shelke

Silver Price Today India: वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील वायदा बाजारात चांदीचा भाव प्रथमच 2.5 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. सोमवारी चांदीच्या किमतीत तब्बल 14,400 रुपयांची वाढ झाली आणि भाव 2,54,174 रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचले.

देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील आकडेवारीनुसार सकाळी 9.25 वाजता चांदी 11,778 रुपयांच्या वाढीसह 2,51,565 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. दिवसभरात हीच चांदी आणखी वाढत 14,387  रुपयांच्या वाढीसह 2,54,174 रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचली. आज सकाळी बाजार उघडताना चांदीचा दर 2,47,194 रुपये होता.

डिसेंबरमध्ये चांदीने दिला मोठा परतावा

डिसेंबर महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस चांदीचा दर 1,74,981 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात चांदी 79,193  रुपये महागली आहे. टक्केवारीत पाहिल्यास, डिसेंबरमध्येच चांदीने 45.28 टक्के परतावा दिला आहे. संपूर्ण वर्षाचा विचार केला, तर गेल्या वर्षाच्या अखेरीस चांदीचा भाव 87,233 रुपये होता. त्या तुलनेत यंदा चांदीने तब्बल 191.37 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

सोन्याच्याही भावात वाढ

चांदीसोबत सोन्याच्याही किमती वाढताना दिसत आहेत. MCX वर सकाळी 9.35 वाजता सोने 355 रुपयांच्या वाढीसह 1,40,228 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. दिवसभरात सोने 571 रुपयांनी वाढून 1,40,444 रुपये प्रति 10 ग्रॅम या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचले. तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या तुलनेत सोन्यातील वाढ तुलनेने मर्यादित असली तरी पुढील वर्षी सोन्याचे दर 1.50 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

चांदीचे भाव किती वाढू शकतात?

विश्लेषकांच्या मते, जागतिक पुरवठ्यातील अडथळे, औद्योगिक मागणी, भू-राजकीय तणाव आणि Federal Reserve कडून संभाव्य व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. MCX वर चांदीचा भाव 2,75,000 रुपये प्रति किलो आणि जागतिक स्तरावर 80 ते 85 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, जगातील सर्वात मोठा चांदीचा ग्राहक असलेल्या चीनने 1 जानेवारी 2026पासून निर्यात नियम कडक करण्याची घोषणा केली आहे. सौर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर होतो. या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 2026 पर्यंतही चांदी आणि सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT