Rule Changes From 1 January 2026: 2025 संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. 1 जानेवारी 2026 पासून अनेक नियम आणि धोरणांमध्ये मोठे बदल होणार आहेत. हे बदल थेट सर्वसामान्य नागरिकांवर, नोकरदारांवर, शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर परिणाम करणारे असतील. बँकिंग नियम, सोशल मीडियाचा वापर, इंधन दर, सरकारी योजना आणि पगाराशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार असल्याने 2026 हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे.
नवीन वर्षापासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. आतापर्यंत 15 दिवसांतून एकदा अपडेट होणारा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट केला जाईल. यामुळे कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे.
काही मोठ्या बँकांनी आधीच कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे 2026 मध्ये गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासोबतच फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याजदरातही बदल होणार आहेत.
UPI आणि डिजिटल व्यवहारांबाबत नियम अधिक कडक केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून PAN–Aadhaar लिंक करणे अनिवार्य असेल. लिंक न केल्यास बँकिंग तसेच अनेक सरकारी सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात.
SIM कार्ड आणि मेसेजिंग अॅप्ससाठीही KYCचे नियम कडक होणार आहेत. WhatsApp, Telegram, Signal यांसारख्या अॅप्सवर फसवणूक थांबवण्यासाठी हे नियम लागू केले जात आहेत.
16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर कडक नियम लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. वयावर आधारित मर्यादा आणि पालकांचे नियंत्रण (parental control) यावर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासारख्या देशांमधील नियमांचा अभ्यास केला जात आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. दिल्ली, नोएडासारख्या भागात पेट्रोल वाहनांद्वारे होणाऱ्या डिलिव्हरीवर मर्यादा घालण्याचा विचार सुरू आहे.
7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार असून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहेत.
महागाई भत्ता (DA) देखील जानेवारी 2026 पासून वाढण्याची शक्यता असून महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. काही राज्यांमध्ये किमान वेतनाचाही आढावा घेण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक (Farmer ID) दिला जाणार आहे. PM-Kisan योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हा ID अनिवार्य असेल. ID नसल्यास पैसे मिळण्यात अडचण येऊ शकतात.
PM पीक विमा योजनेतही बदल होणार आहेत. आता जंगली प्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यासही भरपाई मिळू शकणार आहे. मात्र नुकसान झाल्यानंतर 72 तासांत माहिती देणे आवश्यक असेल.
जानेवारी 2026 मध्ये नवीन आयकर रिटर्न (ITR) फॉर्म येण्याची शक्यता आहे. हा फॉर्म आधीच बँक व्यवहार आणि खर्चाची माहिती भरलेला (pre-filled) असू शकतो. त्यामुळे रिटर्न भरणे सोपे होईल, पण तपासणी अधिक कडक होऊ शकते.
1 जानेवारीपासून LPG सिलिंडर, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि विमान इंधन (ATF) यांच्या दरात बदल होणार आहेत. याचा परिणाम घरगुती बजेट आणि विमान तिकिटांच्या किमतींवर होऊ शकतो.
2026 च्या सुरुवातीपासून बँकिंग, पगार, शेतकरी योजना, सोशल मीडिया आणि इंधन दरांमध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे नववर्ष सुरू होण्यापूर्वीच हे बदल समजून घेणं आणि आवश्यक कागदपत्रं अपडेट ठेवणं सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे.