LPG Cylinder Price Today Pudhari
अर्थभान

LPG Cylinder Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; 19 किलो LPG सिलेंडर 111 रुपयांनी महागला

LPG Cylinder Price Today: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 111 रुपयांची वाढ झाली आहे. हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायांवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे.

Rahul Shelke

LPG Cylinder Price Today: नवीन वर्षाची सुरुवात होताच महागाईमुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही झटका बसला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक (हॉटेल, कॅटरिंग) एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट 111 रुपयांची वाढ केली आहे. हे नवे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू झाले आहेत. मात्र घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशातील इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये 5 रुपये आणि ऑक्टोबरमध्ये 15.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

दिल्लीसह मोठ्या शहरांतील नवे दर

इंडियन ऑयलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 1,691.50 रुपये झाला आहे. याआधी त्याची किंमत 1,580.50 रुपये होती. कोलकात्यात हा सिलेंडर 111 रुपयांनी महागून 1,795 रुपये झाला आहे. मुंबईत 111.50 रुपयांची वाढ होऊन तो 1,642.50 रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये 110.50 रुपयांची वाढ होऊन हा सिलेंडर 1,849.50 रुपये झाला आहे.

घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर

सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये हा सिलेंडर 853 रुपये, कोलकात्यात 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपये दराने मिळत आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल एप्रिल 2025 मध्ये करण्यात आला होता.

एटीएफच्या दरात घट

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे विमान इंधनाच्या (ATF) किमतीत घट करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून दिल्लीमध्ये एटीएफचा दर प्रति 1,000 लिटर 92,323 रुपये झाला आहे, जो याआधी 99,676 रुपये होता. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्येही एटीएफच्या दरात कपात झाली आहे.

एकूणच, नववर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागल्याने हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती ग्राहकांना सध्या तरी एलपीजी दरवाढीपासून दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT