Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: दोन दिवसांत सोनं-चांदी धडाम! चांदी ₹8,803 तर सोनं ₹4,651 स्वस्त; ही खरेदीची योग्य वेळ आहे का?

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली असून, दोन दिवसांत चांदी ₹8,803 तर सोने ₹4,651 ने स्वस्त झाले आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे ₹1,999 ने कमी होऊन ₹1,51,184 वर आला आहे. तर चांदीचा दर किलोमागे ₹2,023 ने घसरून ₹2.28 लाखांवर पोहोचला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत सोन्याचा भाव तब्बल ₹4,651 ने, तर चांदीचा भाव ₹8,803 ने कमी झाला आहे. यापूर्वी सोन्याच्या दरात ₹2,652, तर चांदीच्या दरात ₹6,780 ची घसरण झाली होती.

मोदींच्या आवाहनाचा परिणाम?

मार्केट एक्सपर्ट अनुज गुप्ता यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीवर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम दरांवर दिसून येत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळेही सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे.

दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. या घडामोडींचाही मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होत आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर ₹1.51 लाखांवर

IBJAच्या दरानुसार सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • 24 कॅरेट: ₹1,51,184 प्रति 10 ग्रॅम

  • 22 कॅरेट: ₹1,38,485 प्रति 10 ग्रॅम

  • 18 कॅरेट: ₹1,13,388 प्रति 10 ग्रॅम

  • 14 कॅरेट: ₹88,443 प्रति 10 ग्रॅम

दिल्ली-मुंबईत सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर:

  • दिल्ली: ₹1,52,170

  • मुंबई: ₹1,52,020

  • पुणे: ₹1,52,020

ऑलटाइम हायपासून चांदी तब्बल ₹1.58 लाखांनी स्वस्त

यंदा सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा दर सुमारे ₹1.33 लाख प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर 29 जानेवारीला तो वाढून ₹1.76 लाखांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर सोन्याच्या दरात सुमारे ₹25 हजारांची घसरण झाली आहे.

दुसरीकडे, 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर सुमारे ₹2.28 लाख प्रति किलो होता. 29 जानेवारीला चांदीने तब्बल ₹3.86 लाख प्रति किलोचा ऑलटाइम हाय गाठला होता. या उच्चांकी पातळीपासून चांदीच्या दरात आता तब्बल ₹1.58 लाखांची घट झाली आहे.

सोने-चांदीच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात दर पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT