Gold Silver Price Today India Holi Fall: होळीच्या आधीच सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मंगळवारी, 24 फेब्रुवारी रोजी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर भाव थोडे घसरले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिल 2026 एक्सपायरी असलेलं सोन्याचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सकाळी 1,60,769 रुपयांवर (10 ग्रॅम) उघडलं. मागील व्यवहारात सोनं 1,61,598 रुपयांवर बंद झालं होतं. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सोनं जवळपास 0.63 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 1000 रुपयांनी घसरून 1,60,580 रुपयांवर ट्रेड होत होतं. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने 1,61,233 रुपयांचा उच्चांकही गाठला, मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला.
चांदीच्या किमतीतही आज घसरण दिसली. मार्च 2026 एक्सपायरी असलेली चांदी सुमारे 0.56 टक्क्यांनी म्हणजेच 1,491 रुपयांनी घसरून प्रतिकिलो 2,63,842 रुपयांवर व्यवहार करत होती. आज व्यवहारादरम्यान चांदीने 2,67,500 रुपयांचा उच्चांक गाठला, मात्र नंतर भाव खाली आले.
स्पॉट मार्केटमध्येही प्रमुख शहरांमध्ये चांदीचे दर कमी झाले आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात आज 10 ग्रॅम चांदी सुमारे 2,850 रुपयांना विकली जात आहे, तर 100 ग्रॅमसाठी 28,500 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये मात्र चांदी थोडी महाग असून 10 ग्रॅमचा भाव सुमारे 2,900 रुपये आहे.
सोन्याच्या किरकोळ दरांकडे पाहिल्यास, मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा (10 ग्रॅम) सुमारे 1,61,780 रुपयांवर आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,300 रुपये, तर 18 कॅरेट सोनं सुमारे 1,21,340 रुपयांवर आहे. पुण्यातही जवळपास हेच दर कायम आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे सध्या मौल्यवान धातूंमध्ये दबाव दिसून येत आहे. मात्र होळीपूर्वी झालेल्या या घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार कायम राहू शकते. त्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवत टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक शहाणपणाचं ठरेल.