ED Action On Anil Ambani: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर (Anil Ambani Reliance Group) प्रवर्तन निदेशालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत ईडीने 3,084 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील बांद्रा वेस्ट, पाली हिल भागातील अनिल अंबानी यांचा आलिशान बंगला देखील समाविष्ट आहे. ईडीकडून ही कारवाई 31 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशांनुसार करण्यात आली असून, एकूण चार आदेशांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने ही कारवाई केवळ मुंबईपुरती मर्यादित न ठेवता दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई (कांचीपुरमसह) आणि आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरीपर्यंत केली आहे. यात कार्यालयीन इमारती, निवासी मालमत्ता आणि जमिनींचा समावेश आहे.
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) या दोन कंपन्यांमार्फत सार्वजनिक निधी उभारून त्याचा गैरवापर करण्यात आल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही संस्थांशी संबंधित 40 हून अधिक मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.
तपासात असे दिसून आले आहे की 2017 ते 2019 या कालावधीत येस बँकेने RHFL मध्ये 2,965 कोटी आणि RCFL मध्ये 2,045 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. डिसेंबर 2019 पर्यंत ही गुंतवणूक ‘नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स’ (NPA) ठरली होती. यात RHFLची 1,353.50 कोटी आणि RCFLची 1,984 कोटी रुपये थकबाकी होती.
ईडीने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) आणि संबंधित कंपन्यांचाही तपास केला आहे. या तपासात 13,600 कोटी रुपयांच्या कर्जघोटाळ्याचा उलगडा झाला आहे. त्यातील 12,600 कोटी रुपये संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आले, तर उर्वरित 1,800 कोटी रुपये ठेवी आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इतर कंपन्यांकडे ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
अनिल अंबानी समूहावर ईडीने अलीकडच्या काळात कारवाईचा वेग वाढवला आहे. याआधी 5 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल अंबानी यांना कथित कर्ज फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत रिलायन्स समूहाशी संबंधित 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांमध्ये 50 व्यावसायिक संस्थांचा आणि 25 व्यक्तींचा समावेश होता.
ऑक्टोबर महिन्यात ईडीने रिलायन्स समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना बनावट बँक हमी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली अटक केली होती. या सर्व घडामोडींवरुन असे दिसते की, ईडीने अनिल अंबानी समूहावरचे तपासजाळे आणखी घट्ट केले आहे.