अलीकडील काळात बँकांकडून, म्युच्युअल फंडकडून किंवा डीमॅट खात्यांबाबत सातत्याने नॉमिनीसंदर्भात ग्राहकांना मेसेज पाठवून अलर्ट केले जाते; पण बहुतेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी कायद्याने प्रत्येक व्यक्तीला आपला वारस, नॉमिनी करण्याची परवानगी दिली आहे.
एखादा व्यक्ती बँकेत बचत खाते सुरू करत असेल, तर त्याला नॉमिनीचा कॉलम भरण्याची सूचना केली जाते. नॉमिनीचा सरळ अर्थ असा की, एखाद्या कारणामुळे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील रकमेची जबाबदारी नॉमिनीवर येते. नॉमिनी केवळ बँक खात्यापुरतीच केले जात नाही, तर गुंतवणुकीच्या वेळेसही आपल्या अर्जावर वारसदाराचे नाव लिहिण्यास सांगितले जाते. शेअर बाजारातील गुंतवणूक असो, विमा पॉलिसी असो, बँकेतील लॉकर असो किंवा सरकारी आणि बिगर सरकारी कंपनीत नोकरी असो. प्रत्येक ठिकाणी नॉमिनीचे विवरण भरावे लागते. सर्वसाधारणपणे मालमत्तेसाठी नॉमिनीपेक्षा मृत्युपत्र किंवा इच्छापत्र महत्त्वाचे ठरते. इच्छापत्र तयार केले नाही, तर ती मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसाला मिळते; परंतु एखादी व्यक्ती किंवा सोसायटीत फ्लॅट खरेदी करत असेल, तर त्यास नॉमिनी नियुक्त करणे गरजेचे आहे.
एखादा व्यक्ती आपल्या मालमत्तेसाठी कोणालाही नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकतो. हा नॉमिनी त्या व्यक्तीची आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी किंवा मुलेदेखील असू शकतात. अर्थात, कायदेशीर वारसदेखील नॉमिनी असतात. याशिवाय एखादा व्यक्ती आपल्या मित्राला किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीला नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकतो. मात्र जी व्यक्ती नॉमिनी म्हणून नेमलेली असते, ती व्यक्ती संबंधित मालमत्तेवर आपला हक्क दाखवू शकत नाही. याशिवाय नॉमिनी अल्पवयीन असेल, तर त्यासाठी एक गार्डियनदेखील नेमावा लागतो. हा गार्डियन नॉमिनी सज्ञान झाल्यानंतर त्यास आर्थिक जबाबदारी सोपवू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने अन्य व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा नॉमिनी म्हणून नेमले असेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता नॉमिनीच्या नावावर होईल, असे गृहीत धरणे चुकीचे आहे. नॉमिनी केवळ केअरटेकरची भूमिका बजावू शकतो आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी नेमलेल्या नॉमिनीने सर्व मालमत्ता कायदेशीर वारशाला सोपवणे गरजेचे आहे. कायदेशीर वारशात पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मुले यांचा समावेश असू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण मालमत्ता इच्छापत्राच्या आधारे निश्चित केली असेल, तर नॉमिनीला ती मालमत्ता कायदेशीर वारशाला सोपवणे बंधनकारक आहे.
नोकरदार व्यक्तींनी कंपनीत नॉमिनीचे विवरण भरणे गरजेचे आहे. संबंधित कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास कंपनी पीएफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम नॉमिनीला देते. याशिवाय विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड, बँकेत खाते सुरू करताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करताना नॉमिनीचा कॉलम भरणे गरजेचे आहे. बँकेत संयुक्त रूपाने खाते सुरू असेल तर आणि त्यापैकी एकाचे निधन झाले, तर खात्यातील रक्कम दुसर्या व्यक्तीला मिळते. त्यानंतरच त्याची जबाबदारी नॉमिनीवर येते.