पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतानंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.१ जुलै) तेजीत सुरुवात केली. आज सुरुवातीच्या व्यवहारात एनएसई इक्विटी निर्देशांक निफ्टीने (Nifty) विक्रमी २५ हजारांच्या टप्पा ओलांडला. तर सेन्सेक्सने ८२,१२९ अंकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स ८२ हजारांच्या खाली आला. (Stock Market Updates)
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, निफ्टी आज २५ हजारांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर खुला झाला. विशेष म्हणजे निफ्टी केवळ २४ ट्रेडिंग सत्रांत २४ हजारांवरून २५ हजारांवर पोहोचला आहे. निफ्टीची ही १ हजार अंकांची वाढ शेअर बाजारातील तिसरी सर्वात वेगवान वाढ आहे. तर निफ्टीने २३ हजारांवरून २४ हजारांचा आकडा २३ दिवसांत गाठला. ही शेअर बाजारातील दुसरी सर्वात वेगवान वाढ होती. निफ्टी निर्देशांक ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वाधिक वेगाने वाढला होता. या कालावधीत तो केवळ १९ ट्रेडिंग सत्रांमध्ये १६ हजारांवरून १७ हजारांपर्यंत वाढला होता.
निफ्टी निर्देशांक गेल्या काही दिवसांपासून २४ हजारांची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. सोमवारी त्याने २४,९९९.७५ पर्यंत झेप घेतली होती. पण केवळ २५ हजारांचा टप्पा गाठण्यास त्याला केवळ २५ बेसिस अंक कमी पडले होते. पण त्याने आज गुरुवारच्या सत्रात २५ हजारांच्या अंकाला गवसणी घातली.
निफ्टीवर आज पॉवर ग्रिड, कोल इंडिया, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी हे १ ते ३ टक्क्यांनी टॉप गेनर्स आहेत. तर एम अँड एम, सन फार्मा, टाटा स्टील हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. दोन दिवसीय फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) बैठकीनंतर यूएस फेडरल रिझर्व्हने ३१ जुलै रोजी त्यांचा व्याजदराबाबतचा निर्णय जाहीर केला. यूएस फेडने बेंचमार्क व्याजदर ५.२५ टक्के - ५.५० टक्के असा जैसे थे ठेवला आहे.
या निफ्टी निर्देशांक सुमारे १७ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे तो जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या उदयोन्मुख बाजारांपैकी एक बनला आहे. सकारात्मक जागतिक संकेतामुळे त्याच्या वाढीला चालना मिळाली आहे.