प्रतीकात्मक छायाचित्र.  AI-generated image
आरोग्य

Hangover and Aging : वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? जाणून घ्या शास्त्रीय कारणे

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर अशी लक्षणे अधिक तीव्र होतात

पुढारी वृत्तसेवा

वाढत्‍या वयानुसार अल्कोहोल जास्त वेळ शरीरात राहते आणि त्याचे दुष्परिणाम जास्त जाणवतात.

Hangover and Aging

'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशन मद्यपानाने करणार्‍यांच्‍या तोंडी ‘हँगओव्हर’ हा शब्द असतोच. जल्‍लोषाच्‍या दुसऱ्या दिवशी जाणवणारा शारीरिक त्रास हा अतिजल्‍लोषावर पश्‍चाताप करायला लावणारा ठरतो. मात्र हँगओव्‍हर आणि वय याचा संबंध असल्‍याचे संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. हँगओव्हर ही स्वतः ओढवून घेतलेली एक वैद्यकीय अवस्था आहे. वाढत्‍या वयाबरोबर हँगओव्‍हरचा त्रास अधिक होता. कारण वाढत्या वयानुसार शरीराची अल्कोहोलवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलते, ज्यामुळे हँगओव्हरची तीव्रता वाढते. जाणून घेवूया यासंदर्भातील संशोधनाची संक्षिप्‍त माहिती.

काय सांगते संशोधन?

वयानुसार हँगओव्हर का वाढतो, यावर मर्यादित संशोधन उपलब्ध आहे. काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे...

वाढत्या वयानुसार यकृताचा वेग मंदावतो

वैद्यकीय शास्त्रातील संशोधनानुसार, मानवी शरीरात यकृत हे शरीरातील 'फिल्टर'सारखे काम करते. त्याचे मुख्य काम शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे आहे; पण जसे वय वाढते तसे यकृताचे काम करण्याचा वेग कमी होतो.

पाचक रसांची (Enzymes) कमतरता

मद्य पचवण्यासाठी यकृतामध्ये काही विशिष्ट पाचक रस तयार होतात. तरुणपणी हे रस भरपूर प्रमाणात असतात, पण वाढत्या वयानुसार ते कमी तयार होऊ लागतात.

विषारी घटकांचा साठा

अल्कोहोलचे सेवन केल्‍यानंतर यकृत त्याचे रूपांतर एका विषारी घटकात करते. तरुणपणी यकृत या विषाला लगेच शरीराबाहेर काढते. मात्र, वाढत्या वयामुळे हे विष शरीरात जास्त काळ टिकून राहते. हे विषारी घटक शरीरात जास्त वेळ राहिल्यामुळेच डोकेदुखी, मळमळ आणि अस्वस्थता यांसारखी 'हँगओव्हर'ची लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवतात.

वयोमानानुसार शरीरातील पाण्याचे एकूण प्रमाण कमी होते

वयोमानानुसार शरीरातील पाण्याचे एकूण प्रमाण कमी होते. यामुळे रक्तातील अल्कोहोलची 'संहती' (Concentration) वाढते, परिणामी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येणे यांसारखी लक्षणे अधिक तीव्र होतात. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, याचे अंशतः कारण स्नायूंची पातळी, जिथे त्याचा बराचसा भाग साठवला जातो. कमी पाण्याचा अर्थ अल्कोहोल रक्तप्रवाहात अधिक केंद्रित होतो. वाढत्या वयानुसार मूत्रपिंडाचे कार्यदेखील कमी होते. शरीरातील अपायकारक घटक काढून टाकण्याची गती कमी होते, असेही संशोधनात स्पष्ट झाले आहे.

विविध आजारांसाठी औषधांचाही परिणाम

वाढत्या वयानुसार अनेकजण विविध आजारांसाठी औषधे घेत असतात. ही औषधे अल्कोहोलच्या संपर्कात आल्यास शरीराची संवेदनशीलता वाढवू शकतात. तसेच वाढत्या वयानुसार चरबीचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे स्नायूंमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ती कमी झाल्यामुळे अल्कोहोलचा परिणाम अधिक होतो.

हँगओव्हर टाळण्यासाठी कोणते उपाय कराल?

तज्ज्ञांच्या मते मद्यपान करणाऱ्यांनी त्याचे प्रमाण अत्यंत अल्प ठेवावे. मद्यपानापूर्वी, दरम्यान व नंतर पुरेसे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. तसेच रिकाम्या पोटी मद्यपान टाळा. प्रथिने (Protein) आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने अल्कोहोल शोषण्याचा वेग मंदावतो. गडद रंगाच्या पेयांमध्ये 'कॉन्जेनर्स' नावाची रसायने जास्त असतात, ज्यामुळे हँगओव्हर वाढतो. त्याऐवजी पारदर्शक पेयांची निवड करणे अधिक हिताचे ठरते. अल्कोहोलमुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान करण्यापूर्वी शरीर पूर्णपणे विश्रांती घेतलेले असावे.

मद्यपानावर नियंत्रण ठेवणे हाच उत्तम मार्ग

हँगओव्हर पूर्णपणे टाळण्याचा एकमेव खात्रीशीर उपाय म्हणजे मद्यपान न करणे; पण वाढत्या वयानुसार शरीर बदलत असते. चयापचय क्रिया, यकृताची कार्यक्षमता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण यातील बदलांमुळे हँगओव्हर जास्त त्रासदायक ठरतो. त्यामुळे आपल्या शरीराचे संकेत ओळखून मद्यपानावर नियंत्रण ठेवणे हाच उत्तम मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT