

हँगओव्हर ही स्वतः ओढवून घेतलेली एक वैद्यकीय अवस्था आहे. त्यावर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांना वैद्यकीय मानके पूर्ण करणे आवश्यक असते. अशा अभ्यासांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो, जो सप्लिमेंट कंपन्यांना परवडणारा नसतो.
Hangover Avoid tips
मुंबई : 'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देतानाचे अनेकांनी प्लॅनिंगही केले असेल; पण दरवर्षी 'थर्टी फर्स्ट'बरोबरच ‘हँगओव्हर’ हाही शब्द सेलिब्रेशन करणाऱ्यांच्या तोंडी असतोच. कारण नवीन वर्षाच्या पहिल्या काही तासांत अनेक लोक मद्याच्या नशेत असतील आणि त्यानंतर काही वेळातच त्यांना त्याचा पश्चात्ताप होईल. जाणून घेवूया Hangover Avoid करण्यासाठी काय करायचं? बाजारातील उपाय खरोखरच प्रभावी आहेत का? याविषयी...
बाजारात सध्या काही पदार्थ हे हँगओव्हरची लक्षणे सुरू होण्यापूर्वीच मद्याचे दुष्परिणाम रोखण्याचा दावा करतात. हे पदार्थ शरीरातील अल्कोहोल पचवण्याची क्षमता वाढवणाऱ्या वनस्पती अर्कांपासून (plant extracts) ते जनुकीय बदल केलेल्या बॅक्टेरियांपर्यंत अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. मात्र, हे उपाय खरोखरच काम करतात का? याविषयी माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
'द इकॉनॉमिस्ट'मधील रिपोर्टनुसार, बाजारात हँगओव्हरची लक्षणे सुरू होण्यापूर्वीच मद्याचे दुष्परिणाम रोखण्याचा दावा करणार्या सप्लिमेंट्सच्या प्रभावीपणाबद्दलचे पुरावे अत्यंत तोकडे आहेत. हँगओव्हरवरील उपचारांच्या २१ अभ्यासांचे विश्लेषण केले असता, त्यातील केवळ सात उपाय काही प्रमाणात गुणकारी ठरल्याचे दिसून आले. मात्र, हे पुरावे 'अत्यंत निम्न दर्जाचे' असल्याचे संशोधकांनी नमूद केले. दिलासादायक बाब म्हणजे, या गोळ्यांमुळे प्रकृती बिघडत नाही. लवंगाचा अर्क, टोल्फेनॅमिक ॲसिड आणि पायरिटिनॉल असलेल्या गोळ्यांवर अधिक संशोधनाची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लंडनमधील न्यूरोसायकोफार्माकोलॉजिस्ट डॉ. डेव्हिड नट यांच्या मते, हँगओव्हर ही स्वतः ओढवून घेतलेली एक वैद्यकीय अवस्था आहे. त्यावर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांना वैद्यकीय मानके पूर्ण करणे आवश्यक असते. अशा अभ्यासांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो, जो सप्लिमेंट कंपन्यांना परवडणारा नसतो.
काही लोक सप्लिमेंट्सऐवजी सोपे मार्ग निवडतात. डॉ. नट यांच्या मते, गडद रंगाच्या मद्यामध्ये असलेले 'कॉन्जेनर्स' (congeners) हँगओव्हरसाठी अधिक कारणीभूत ठरतात. काही जण झोपण्यापूर्वी 'ऍक्टिव्हेटेड चारकोल' घेतात. मात्र, चारकोलचा अल्कोहोलवर फारसा परिणाम होत नाही. उलट, तो इतर औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतो, त्यामुळे त्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे, असा इशाराही ते देतात.
तुम्हाला सकाळी उठल्यावर मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्यावर कोणताही खात्रीशीर 'इलाज' नाही. डॉ. नट स्पष्ट करतात की, "तुम्ही हँगओव्हर पूर्णपणे बरा करू शकत नाही, फक्त लक्षणांवर उपचार करू शकता." पाणी, कॅफीन, सकस आहार किंवा वेदनाशामक गोळ्या काही प्रमाणात आराम देऊ शकतात. तेलकट पदार्थ खाल्ल्याने अल्कोहोल शोषले जाते, हा समज चुकीचा आहे, कारण तोपर्यंत अल्कोहोल आधीच रक्तात मिसळलेले असते, असेही डॉ. नट यांनी स्पष्ट केले आहे. हँगओव्हर पूर्णपणे टाळायचा असेल तर मर्यादित मद्यपान, पाणी पिण्याची सवय आणि योग्य आहार हेच सर्वोत्तम उपाय आहेत, याचे भान नववर्षाला निरोप देताना याचे भान मद्यपी ठेवणे आवश्यक आहे.