

वॉशिंग्टन : जर तुम्हालाही दिवसभर तुमची आवडती गाणी ऐकायला आवडत असेल, तर ही सवय फक्त मूड चांगला करणारी नाही, तर तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे. संगीत मनाला स्पर्श करून जातेच, पण मेंदूला सक्रिय ठेवण्याचे कामही करते. नवीन संशोधनात आढळले आहे की, दररोज थोडेफार संगीत ऐकल्याने डिमेन्शियापासून संरक्षण मिळू शकते.
2025 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकिएट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या संशोधनात असे आढळले की, रोज संगीत ऐकणार्या किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संगीताशी जोडलेल्या वृद्धांमध्ये डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या कमी असतो. ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 70 वर्षांवरील 10,800 पेक्षा जास्त लोकांवर हा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. दररोज संगीत ऐकणार्यांमध्ये डिमेन्शियाचा धोका तब्बल 39 टक्के कमी आढळला.
यांच्या मेमरी, विचारशक्ती आणि ब्रेन स्कोअरमध्येही स्पष्ट सुधारणा दिसून आली. त्याच्या तुलनेत क्वचितच संगीत ऐकणार्यांना हा फायदा मिळाला नाही. तज्ज्ञांच्या मते, संगीत संपूर्ण मेंदूला एकाचवेळी सक्रिय करते, जणू मेंदूला पूर्ण वर्कआऊट मिळाल्यासारखे. संगीताने स्मरणशक्ती मजबूत होते. विचार करण्याचा वेग वाढतो, भाषा समजून घेण्याची क्षमता सुधारते, मेंदू ताजातवाना आणि सक्रिय राहतो. वाद्य वाजवणारे किंवा गाणार्या लोकांना डिमेन्शियाचा धोका 35 टक्के कमी असतो. तसेच संगीत ऐकणे व वाद्य वाजवणे दोन्ही करणार्यांना हा धोका 33 टक्क्यांनी कमी असतो. कॉग्निटिव्ह इम्पिरमेंटचा धोका 22 टक्क्यांनी कमी असतो.