Indian Diabetes Risk Pudhari
आरोग्य

Indian Diabetes Risk: भारतीयांचे वजन कमी, तरीही डायबिटीजचा धोका जास्त का? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणे

Indian Diabetes Risk: भारतीयांचे वजन आणि BMI सामान्य असतानाही त्यांना टाइप-२ डायबिटीज होण्याचा धोका असतो.

Rahul Shelke

Indian Diabetes Risk: भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, शरीराचे वजन सामान्य असतानाही अनेकांना डायबिटीजचे निदान होत आहे. त्यामुळे वजन जास्त नसताना डायबिटीज कसा होऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण डायबिटीजचा धोका फक्त वजनावर अवलंबून नसतो. शरीरात चरबी किती आहे, ती कोणत्या भागात जमा झाली आहे आणि स्नायूंचे प्रमाण किती आहे, यावरही हा धोका ठरतो. डॉक्टरांनी यामागची महत्त्वाची कारणे सांगितली आहेत.

भारतात डायबिटीजचे रुग्ण वाढत आहेत

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, भारतात १८ वर्षांवरील सुमारे ७७ दशलक्ष लोक टाइप-२ डायबिटीजने ग्रस्त आहेत. तर जवळपास २५ दशलक्ष लोक प्रीडायबिटीजच्या स्थितीत आहेत. प्रीडायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते; मात्र त्याचे डायबिटीजमध्ये रूपांतर झालेले नसते.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि आनुवंशिक कारणांमुळे डायबिटीजचा धोका वाढत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, डोळे आणि शरीरातील इतर अवयवांवर होऊ शकतो.

वजन कमी असूनही डायबिटीज का होतो?

कैलाश दीपक हॉस्पिटलमधील एंडोक्रायनोलॉजी विभागाच्या सल्लागार डॉक्टर प्रिया यांच्या मते, अनेक रुग्णांचे वजन सामान्य असते. मात्र, रक्ताच्या तपासणीत त्यांना डायबिटीज असल्याचे समोर येते. अशा वेळी रुग्णांचा पहिला प्रश्न असतो की, माझे वजन तर जास्त नाही, मग मला डायबिटीज कसा झाला?

याचे मुख्य कारण म्हणजे डायबिटीजचा संबंध केवळ शरीराच्या वजनाशी नसतो. शरीरात चरबीचे प्रमाण किती आहे आणि ती नेमकी कुठे जमा झाली आहे, हेही महत्त्वाचे असते.

एकाच BMI असलेल्या दोन व्यक्तींच्या शरीररचनेत फरक असू शकतो. इतर देशांतील लोकांच्या तुलनेत भारतीयांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आणि स्नायूंचे प्रमाण कमी असते. विशेषतः पोटाभोवती आणि यकृतासारख्या अंतर्गत अवयवांभोवती चरबी जमा होण्याच प्रमाण वाढत आहे.

काय असते विसरल फॅट?

शरीरातील अंतर्गत अवयवांच्या आसपास जमा होणाऱ्या चरबीला विसरल फॅट (Visceral Fat) म्हणतात. ही चरबी पोटाच्या आतील भागात, यकृत आणि इतर अवयवांच्या आसपास जमा होते.

या चरबीचा शरीराच्या इन्सुलिन वापरण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. इन्सुलिन हे स्वादुपिंडातून तयार होणारे हार्मोन आहे. ते रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. मात्र, शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसतील, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे वजन सामान्य असले, तरी शरीरात विसरल फॅट जास्त असल्यास तिला डायबिटीजचा धोका असू शकतो.

स्वादुपिंडावरही वाढतो ताण

शरीरात इन्सुलिन तयार करण्याचे काम स्वादुपिंड (Pancreas) करते. शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नसतील, तर स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.

मात्र, स्वादुपिंड शरीराची वाढलेली गरज पूर्ण करू शकले नाही, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे डायबिटीज होण्याचा धोका निर्माण होतो.

याशिवाय कुटुंबात आधीपासून डायबिटीजचा इतिहास असणे आणि शारीरिक हालचाली कमी असणे यामुळेही हा धोका वाढू शकतो. त्यामुळे केवळ वजन पाहून डायबिटीजचा धोका कमी आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.

भारतीयांमध्ये डायबिटीजचा धोका वाढण्यामागे आणखी कोणती कारणे?

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीज विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अपराजिता प्रधान यांच्या मते, भारतीयांच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण तुलनेने कमी असणे, आनुवंशिक कारणे आणि इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींची कार्यक्षमता यांचाही डायबिटीजच्या धोक्यावर परिणाम होतो.

याशिवाय दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार आणि अपुरी झोप यामुळेही डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे शरीराचे वजन सामान्य असले, तरी डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः पोटाभोवती वाढणारी चरबी, कुटुंबातील डायबिटीजचा इतिहास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

डायबिटीजपासून वाचण्यासाठी काय करावे?

डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी केवळ वजन नियंत्रणात ठेवणे पुरेसे नाही. त्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.

  • दररोज नियमित व्यायाम किंवा चालण्याची सवय लावा.

  • आहारात भाज्या, फळे, कडधान्ये आणि प्रथिनांचा समावेश करा.

  • गोड पदार्थ, साखर आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा.

  • पोटाभोवती वाढणाऱ्या चरबीकडे दुर्लक्ष करू नका.

  • पुरेशी झोप घ्या

  • कुटुंबात डायबिटीजचा इतिहास असल्यास नियमित रक्तातील साखरेची तपासणी करा.

महत्त्वाचे म्हणजे, तुमचा BMI सामान्य आहे म्हणून तुम्हाला डायबिटीजचा धोका नाही, असे समजू नका. वजनासोबतच कंबरेचा घेर, कौटुंबिक इतिहास आणि रक्तातील साखरेची पातळी तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वेळेवर तपासणी आणि योग्य जीवनशैलीमुळे डायबिटीजचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT