Employees Become Millionaires: कंपनी असावी तर अशी! 5,100 कर्मचारी रातोरात कोट्यधीश; अनेकांच्या संपत्तीत 930 कोटींची भर, असं काय घडलं?

Anthropic IPO Employees Millionaires: AI कंपनी अँथ्रोपिकच्या IPO मुळे कंपनीतील सुमारे 5,300 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 5,100 कर्मचारी कोट्यधीश झाले आहेत.
Anthropic IPO Employees Millionaires
Anthropic IPO Employees MillionairesPudhari
Published on: 
Updated on: 

Anthropic IPO Employees Millionaires: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील कंपनी अँथ्रोपिकने आपल्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः मालामाल केलं आहे. कंपनीच्या शेअर बाजारातील दमदार एन्ट्रीनंतर हजारो कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीतील सुमारे 5,300 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 5,100 कर्मचारी आता कोट्यधीश झाले आहेत. त्यापैकी जवळपास 600 कर्मचाऱ्यांकडे असलेल्या शेअर्सची किंमत 100 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 930 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

कंपनीच्या आयपीओमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीचा हा आकडा त्यांच्या शेअर्सच्या सध्याच्या बाजारमूल्यावर आधारित आहे. याचा अर्थ या सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एवढी रक्कम जमा झाली आहे, असा होत नाही. प्रत्यक्ष पैसे मिळण्यासाठी त्यांना शेअर्स विकावे लागतील. त्यानंतर कर वजा करून उरलेली रक्कम त्यांच्या हातात येईल.

5,300 कर्मचाऱ्यांपैकी 5,100 जण कोट्यधीश

अमेरिकेतील वृत्तवाहिनी CNN च्या अहवालानुसार, अँथ्रोपिकने आपल्या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 83 डॉलर निश्चित केली होती. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या शेअर्सच्या मूल्यामध्ये मोठी वाढ झाली.

कंपनीच्या कागदपत्रांनुसार, सप्टेंबरपर्यंत अँथ्रोपिकमध्ये सुमारे 5,300 कर्मचारी काम करत होते. यापैकी जवळपास 5,100 कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्य 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 9.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

हिल डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार, जवळपास 600 कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्य 100 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक झाले आहे. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 930 कोटी रुपयांच्या आसपास जातो. तर सुमारे 2,800 कर्मचाऱ्यांकडे 10 दशलक्ष डॉलर म्हणजेच 93 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स आहेत. विशेष म्हणजे, कंपनीतील सुमारे 96 टक्के कर्मचाऱ्यांकडे किमान 1 दशलक्ष डॉलर मूल्याचे शेअर्स आहेत.

अवघ्या काही वर्षांत बदललं कर्मचाऱ्यांचं नशीब

अँथ्रोपिकची स्थापना 2021 मध्ये झाली. 2024 च्या अखेरपर्यंत कंपनीत 1,000 पेक्षाही कमी कर्मचारी होते. मात्र, त्यानंतर कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढला. AI क्षेत्रातील वाढती मागणी आणि कंपनीच्या विस्तारामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.

कंपनीच्या सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांना पगारासोबत कंपनीचे शेअर्सही मिळाले होते. त्यामुळे कंपनीची किंमत वाढल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्यही प्रचंड वाढले.

हिल डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू बेन्सन यांनी CNN शी बोलताना या बदलाबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, इतक्या कमी काळात अँथ्रोपिकच्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत झालेली वाढ विशेष आहे.

कंपनीतील कर्मचारी नोकरी सोडण्याचे प्रमाणही कमी राहिले. कंपनी भविष्यात आणखी मोठी होऊ शकते, याची कर्मचाऱ्यांना कल्पना होती. त्यामुळे नोकरी सोडल्यास भविष्यात मिळू शकणाऱ्या मोठ्या आर्थिक फायद्यापासून आपण वंचित राहू, अशी भीतीही काही कर्मचाऱ्यांना होती.

पगारासोबत शेअर्स देण्याचा निर्णय ठरला फायदेशीर

सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअप्स कर्मचाऱ्यांना पगारासोबत कंपनीचे शेअर्स देतात. यामागे कंपन्यांचा उद्देश कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ कंपनीसोबत जोडून ठेवण्याचा असतो.

कंपनीची कामगिरी सुधारली किंवा भविष्यात कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली, तर या शेअर्सचे मूल्य वाढू शकते. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो.

अँथ्रोपिकच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे. विशेष म्हणजे, कंपनीत कोणत्या पदावर काम करता यापेक्षा कंपनीत किती लवकर आलात, याला अधिक महत्त्व आहे.

अँड्र्यू बेन्सन यांच्या मते, 2023 किंवा 2024 मध्ये कंपनीत दाखल झालेला एखादा कर्मचारी आज कंपनीत नव्याने दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षाही अधिक संपत्तीचा मालक असू शकतो. कारण सुरुवातीच्या काळात कंपनीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना तुलनेने अधिक शेअर्स मिळाले होते. कंपनीची किंमत वाढल्यामुळे त्याचा मोठा फायदा या कर्मचाऱ्यांना झाला.

आयपीओच्या पहिल्याच दिवशी शेअर्स विकण्याची संधी

अँथ्रोपिकच्या आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांना आणखी एक विशेष फायदा मिळाला. सामान्यतः एखादी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर तिच्या कर्मचाऱ्यांना आणि कंपनीशी संबंधित काही गुंतवणूकदारांना लगेच शेअर्स विकता येत नाहीत.

यासाठी लॉक-इन कालावधी असतो. हा कालावधी साधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा असतो. या काळात संबंधित व्यक्तींना आपले शेअर्स विकण्यावर मर्यादा असतात.

मात्र, अँथ्रोपिकने कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था केली. कंपनीने संस्थापक नसलेल्या अंतर्गत भागधारकांना शेअर बाजारातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी आपल्याकडील शेअर्सपैकी 10 टक्क्यांपर्यंत शेअर्स विकण्याची परवानगी दिली.

यासाठी टप्प्याटप्प्याने लागू होणारी लॉक-इन व्यवस्था तयार करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात शेअर्स विकले आणि किती जणांनी नफा कमावला, याची माहिती समोर आलेली नाही.

Anthropic IPO Employees Millionaires
EPFO New PF Withdrawal Rules: EPFOचा मोठा निर्णय! आता PF मधील 90 टक्के रक्कम काढता येणार; कोणाला होणार फायदा?

SpaceX पेक्षाही अँथ्रोपिकची कामगिरी वेगवान

कर्मचाऱ्यांना कोट्यधीश बनवण्याच्या बाबतीत अँथ्रोपिकची तुलना एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीशी केली जात आहे.

SpaceX ने जूनमध्ये मोठ्या आयपीओद्वारे शेअर बाजारात एन्ट्री केली होती. मात्र, या कंपनीला खासगी कंपनी म्हणून काम करताना दोन दशकांहून अधिक काळ झाला होता. SpaceX मधील सुमारे 22,000 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 4,400 कर्मचारी आयपीओनंतर कोट्यधीश झाले होते.

दुसरीकडे, अँथ्रोपिकने अवघ्या काही वर्षांत आपल्या 5,300 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 5,100 कर्मचाऱ्यांना कोट्यधीश बनवलं आहे. त्यामुळे कंपनीच्या वाढीचा वेग आणि कर्मचाऱ्यांना मिळालेला आर्थिक फायदा चर्चेत आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता

अँथ्रोपिकच्या आयपीओचा परिणाम आता अमेरिकेतील रिअल इस्टेट बाजारावरही होण्याची शक्यता आहे. विशेषतः सॅन फ्रान्सिस्को शहरातील घरांच्या किमतींवर याचा परिणाम होऊ शकतो.

याचं कारण म्हणजे अँथ्रोपिकचे बहुतांश कर्मचारी सॅन फ्रान्सिस्को परिसरात काम करतात. आयपीओमुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यापैकी अनेक जण घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात. परिणामी, शहरातील घरांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Anthropic IPO Employees Millionaires
Gold Silver Price Today: सोन्या चांदीचे दर पुन्हा कोसळले! मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोनं किती रुपयांवर? पुढे आणखी स्वस्त होणार?

रिअल इस्टेट कंपनी रेडफिनच्या आकडेवारीनुसार, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ऑक्टोबर महिन्यात एका सामान्य घराची सरासरी विक्री किंमत 1.7 दशलक्ष डॉलर होती. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्यात सुमारे 19 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, अमेरिकेतील नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्सच्या आकडेवारीनुसार, याच काळात अमेरिकेतील घरांची सरासरी किंमत 4,16,700 डॉलर होती. त्यात वर्षभराच्या तुलनेत फारसा बदल झालेला नव्हता.

अशा परिस्थितीत अँथ्रोपिकच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या संपत्तीमुळे सॅन फ्रान्सिस्कोमधील घरांच्या मागणीवर आणि किमतींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.