Teenage Fitness Impact On Adult Mental Health : व्यायामाचा संबंध बऱ्याच काळापासून चांगल्या मानसिक आरोग्याशी जोडला गेला आहे. पण तुम्ही लहानपणी किंवा किशोरवयात किती तंदुरुस्त आहात, यावरून अनेक वर्षांनंतर तुमच्या आरोग्याचा अंदाज लावता येतो का? यावरील संशोधनात याचे उत्तर होकारार्थी आले होते. टीनेज (किशोरवया)मध्ये तंदुरुस्त असणे वृद्धपकाळातलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करू शकते, असे एका नवीन संशोधनात आढळले आहे.
“युरोन्यूज”च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन संशोधकांनी १९८५ मधील एका राष्ट्रीय सर्वेक्षणातील १,००० हून अधिक लोकांच्या नोंदींचा अभ्यास केला. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या अभ्यासात नैराश्याची वैद्यकीय लक्षणे तपासण्यासाठी लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या बालपणातील फिटनेसची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये 'कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेस' (हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता) तपासण्यासाठी १.६ किलोमीटरची धावण्याची शर्यत आणि स्नायूंची ताकद तपासण्यासाठी 'स्टँडिंग लाँग जंप' (उभी लांब उडी) या शारीरिक चाचण्यांचा समावेश होता. यातील एका लहान गटाची सायकलिंग आणि हातांच्या पकडीची ताकद (हँडग्रिप स्ट्रेंथ) देखील तपासली गेली.jhjh
'जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, उत्तम कार्डिओव्हस्कुलर फिटनेस दर्शवणारा धावण्याचा वेग ज्या तरुणांचा चांगला होता, त्यांना प्रौढ वयात नैराश्य येण्याचा धोका १५ टक्क्यांनी कमी होता. या चाचणीत धावण्याची सरासरी वेळ साधारण ८ मिनिटे आणि २७ सेकंद होती. सरासरी वेळेपेक्षा सुमारे १ मिनिट १५ सेकंद जलद धावणाऱ्यांमध्ये नैराश्याचा हा धोका कमी झाल्याचे दिसून आले.
कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेसचा हा संरक्षक फायदा पहिल्या चाचणीनंतरच्या ५ ते १० वर्षांत - म्हणजेच सहभागी व्यक्ती बालपणाच्या सर्वात जवळ असताना - सर्वात जास्त दिसून आला. काळानुसार तो हळूहळू कमी होत गेला. तरीही, संपूर्ण ३४ वर्षांच्या अभ्यासाच्या कालावधीत हा संबंध कायम राहिलेला आढळला. कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेसच्या सर्व निकषांवर, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा संरक्षक प्रभाव अधिक प्रभावी असल्याचे लेखकांनी नमूद केले. तसेच महिलांना आयुष्यात नैराश्याचा सामना करावा लागण्याची शक्यता अधिक होती.
"लहानपणातील तंदुरुस्तीचा अभाव हा प्रौढांमधील नैराश्याचे कारण ठरतो असे आपण ठामपणे म्हणू शकत नसलो, तरी बालपणातील फिटनेसचे फायदे केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नसून त्याहून अधिक आहेत, हे या निष्कर्षांवरून स्पष्ट होते," असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक काइल स्मिथ यांनी म्हटले आहे. "नैराश्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे कोणताही एकच घटक याचा धोका पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही. फिटनेस हा यातील एक महत्त्वाचा भाग असू शकतो," असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या ३० वर्षांत जगभरात चिंता (Anxiety) आणि नैराश्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्यामुळे मानसिक आजारांसह जगणाऱ्या लोकांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. जागतिक स्तरावर, सुमारे ३२ कोटी २० लाख प्रौढ म्हणजेच दर २० पैकी एक व्यक्ती नैराश्याशी झुंज देत आहे. हे प्रमाण जसजसे वाढत आहे, त्यामुळेच आता या समस्येला रोखण्यास या जीवनशैलीतील घटकांवर संशोधक भर देत आहेत.