Spicy Food Health Benefits  Pudhari
आरोग्य

Spicy Food Health Benefits : मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाण्याचा दीर्घायुष्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या संशोधन काय सांगते?

Spicy Food Health Benefits : आठवड्यात ६ दिवस तिखट खाणाऱ्यांबाबत संशोधनातून मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

Spicy Food Health Benefits : ‘झणझणीत आणि चमचमीत पदार्थ’... फक्त नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही! पण “जास्त मसालेदार खाल्लं की पित्त होणार आणि आरोग्य बिघडणार,” हे समीकरण आपल्या डोक्यात पार पक्कं बसलेलं असतं. त्यामुळेच जिभेचे चोचले पुरवताना 'हे शरीरासाठी हानिकारक तर नाही ना?' असा विचार मनात चमकून जातोच. मात्र, काही वर्षांपूर्वी झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनाने या जुन्या समजूतीला पूर्णपणे छेद दिला आहे. एवढेच नाही, तर नियमित आणि योग्य प्रमाणात मसालेदार अन्न खाणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी असल्याचं समोर आलं आहे. मसालेदार पदार्थांमध्ये असणारे विविध घटक आणि त्यांचे शरीराला होणारे अनोखे फायदे याबाबत हे संशोधन नक्की काय सांगते? जाणून घेऊया सविस्तर...

मसालेदार किंवा तिखट अन्नपदार्थ खाण्याचा थेट संबंध दीर्घायुष्याशी

२०१५ मध्ये झालेल्या एका मोठ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मसालेदार किंवा तिखट अन्नपदार्थ खाण्याचा थेट संबंध अधिक आयुर्र्मानाशी (दीर्घआयुष्याशी) असू शकतो.

तब्बल ४.८ लाख लोकांवर संशोधन

२००४ ते २००८ दरम्यान वैज्ञानिकांनी चीनमधील तब्बल ५ लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी केली आणि पुढील अनेक वर्षे त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवले. ४ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांच्या आहाराच्या अभ्यासातून एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे. नियमितपणे मसालेदार आणि तिखट अन्न खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक 'बीएमजे' (BMJ) मध्ये प्रकाशित झाले होते.

चार वर्षांहून अधिक काळ चाललेला अभ्यास

२००४ ते २००८ या कालावधीत चीनमधील एका मोठ्या आरोग्य मोहिमेअंतर्गत सहभागींची नोंदणी करण्यात आली होती. संशोधकांनी सरासरी ७ वर्षांहून अधिक काळ या लोकांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले. या कालावधीत एकूण २०,२२४ मृत्यूंची नोंद झाली.

संशोधनातील मुख्य निष्कर्ष

संशोधना कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास, वय, शिक्षण, मधुमेह आणि धूम्रपान यांसारख्या सर्व घटकांचा प्रभाव बाजूला ठेवून पाहिल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या...

  • आठवड्यातून १ ते २ वेळा प्रामुख्याने मिरची असलेले तिखट पदार्थ खाणाऱ्यांमध्ये एकूण मृत्यूचा धोका १० टक्क्यांनी कमी आढळला.

  • आठवड्यातून ६ ते ७ वेळा मसालेदार अन्न खाणाऱ्यांमध्ये हा धोका १४ टक्क्यांनी कमी दिसून आला.

  • तसेच, तिखट अन्न खाणाऱ्यांमध्ये इस्कीमिक हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आढळले.

अमेरिकेतील अभ्यासातूनही चीनमधील संशोधनाला पुष्टी

या अभ्यासानंतर दोन वर्षांनी अमेरिकेतही मसालेदार आणि तिखट खाण्यावर संशोधन झाले. या संशोधनातून चीनमधील संशोधनाच्या निष्कर्षांना दुजोरा मिळाला. ज्या अमेरिकन नागरिकांनी लाल तिखट मिरच्यांचा (Hot Red Chile Peppers) आहारात वापर केला होता, त्यांच्या मृत्यूची शक्यता तिखट न खाणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे १३ टक्क्यांनी कमी होती.

मिरचीतील 'कॅप्सॅसिन'चा कमाल प्रभाव

संशोधकांनी यातून थेट 'कारण आणि परिणाम' (Cause and Effect) असा निश्चित निष्कर्ष काढलेला नाही; मात्र मिरचीतील मुख्य घटक असलेल्या 'कॅप्सॅसिन'मध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि सूज/दाह कमी करणारे गुणधर्म असतात, हे आधीच्या अनेक अभ्यासांत सिद्ध झाले आहे. "या निष्कर्षांची अधिक खात्री करण्यासाठी आपल्याला आणखी पुराव्यांची, विशेषतः क्लिनिकल ट्रायल्सची गरज आहे. तसेच इतर देशांतील लोकसंख्येचा डेटा पाहण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत," असेही तेव्हा संशोधकांनी नमूद केले होते.

काही शंका आणि सावधगिरी

मसालेदार अन्नाचे फायदे मजबूत संशोधनावर आधारित असले, तरी तिखट खाल्ल्यामुळेच आयुष्य वाढते हे १००% सिद्ध झालेले नाही. काही बाबतीत यासंबंधीची आकडेवारी अद्याप अस्पष्ट आहे. उदाहरणार्थ, काही अभ्यासांमध्ये असेही समोर आले आहे की, जास्त मसालेदार अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो (जरी सर्वच अभ्यासांत हे दिसून आलेले नाही).

टीप: कॅप्सॅसिन आणि मृत्यूदर घटण्यामधील थेट संबंध अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मसाल्यांचे सेवन करताना वैयक्तिक आरोग्य आणि पचनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT