

आपण सर्व मानव आहोत. आनंद, दु:ख, राग, घाबरणं या भावना प्रत्येकाला येतात. मग, पुरुष वेगळे कसे? त्यांनाही भावना येतात, त्यांनाही रडावंसं वाटतं; पण आपण म्हणतो की, पुरुष रडत नाहीत. म्हणून ते स्वतःला थांबवतात. पुरुष भावना दडपतात. कारण, त्यांना तसं शिकवलं गेलंय; पण भावना अनावर होतात तेव्हा... त्यांना व्यक्त करायला सुरक्षित जागा मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक व्यक्ती एकटी बसून रडताना दिसली. तिने आपल्या चेहर्यावर हात ठेवलेला दिसतो. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. आपलं दु:ख लपवण्याचा तो पुरुष प्रयत्न करतो. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या.
पुरुषांनाही भावना अनावर होतात, पुरुषदेखील रडतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ हे आता बदलले आहे. पुरुषांच्या मनातही लाटा असतात, दु:ख असतं, स्वप्नं असतात, भीती असते आणि ती व्यक्त होणं अतिशय आवश्यक आहे. भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नाही, ते मानवतेचं आणि परिपक्वतेचं चिन्ह आहे. भावनांच्या ओझ्याखाली राहून मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम भोगण्यापेक्षा पुरुषांच्या मनातील ही शांतता ओझं बनू न देता ती बोलकी आणि मुक्त होऊ देणं गरजेचं आहे. त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. पुरुषांच्या आत्महत्या स्त्रियांपेक्षा जास्त आहेत, हे दिसून आलेले आहे.
आपल्या समाजात भावना हे विषय बहुतेक वेळा महिलांशी जोडले जातात. ‘पुरुषांबद्दल बोलताना मात्र तो तर मजबूत आहे, पुरुष रडत नाहीत, मन कठोर ठेवलं पाहिजे’ अशी वाक्यं ऐकायला मिळतात. लहानपणापासूनच अनेक मुलांना रडू येतं ते थांबवलं जातं, भीती वाटली, तरी गप्प बसायला सांगितलं जातं आणि मनात भावना दाटून आल्या, तरी त्या परिस्थितीन्वये आपसूक दडपल्या जातात; पण प्रश्न असा आहे की, पुरुष भावना दडपतात का? आणि याचा त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर आणि समाजावर नेमका काय परिणाम होतो?
भावना म्हणजे कमजोरी : एक गैरसमज
अद्याप एक ठाम समज आहे की, भावना व्यक्त करणं हे कमजोरीचे चिन्ह आहे. पुरुषाने कुठेही कमकुवत दिसू नये, रडू नये, भीती व्यक्त करू नये आणि नेहमीच द़ृढ राहावं, हा कालबाह्य विचार अनेकांच्या नकळत मनात बसलेला आहे. परिणामी, अनेकदा भावना दडपल्यामुळे पुरुष रडताना दिसतात.
बालपणापासून रोवली गेलेली शिकवण ‘काय बाईसारखं रडतोस?, पुरुष रडत नाहीत, शूरपणे वाग, धाडसी हो, तू मुलगा आहेस’ ही वाक्यं त्यांच्या मनात बिंबवली जातात. मुलगा मोठा होत जातो आणि त्याला भीती, गोंधळ, दु:ख, एकटेपणा यांसारख्या भावनाही व्यक्त करायला भीती वाटू लागते. अशावेळी तो भावनिकरीत्या व्यक्त होण्याऐवजी शांतपणा, दूर राहणं, राग, ताण अशा मार्गांनी प्रतिक्रिया व्यक्त होतात. पुरुषांकडून अपेक्षित असतं की, त्यांनी प्रत्येक समस्येला धिराने तोंड द्यावं; पण प्रश्न असा आहे की, पुरुष भावना दाबतात का? त्यांनाही मानवी भावना असतातच. विविध तणावांमुळे पुरुष न सांगताही स्वतःवर मोठं ओझं वाहून नेतात; पण भावना दडपण्याचे दुष्परिणाम हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारे ठरतात. भावना आतमध्ये दाबून ठेवणं म्हणजे प्रेशर कुकरमध्ये स्टीम जमा करण्यासारखं आहे. कधीतरी ते फुटण्याची शक्यता असते.
यामुळे उदासीनता, ताणतणाव, चिंता, एकटेपणा, झोपेचे विकार, भावनिक सुन्नपणा वाढू शकतात. शिवाय नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असते. जेव्हा पुरुष आपल्या मनातील भावना सांगत नाहीत, तेव्हा त्यांना नात्यांमध्ये गैरसमजांना सामोरे जावे लागते. कधी कधी जोडीदाराला किंवा कुटुंबाला कळतच नाही की, ते नेमके काय अनुभवत आहेत. परिणामी, संवाद कमी होतो, भांडणं वाढतात, भावनिक अंतर तयार होतं, तसेच अत्याधिक ताणामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार, डोकेदुखी, पोटाचे आजार अशा शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.
‘राग’ हा छुपा संकेत
अनेक पुरुष आपल्या दु:ख किंवा गोंधळाच्या भावनांना रागात व्यक्त करतात. त्यांचं खर्याअर्थाने मन म्हणत असतं, माझं ऐका, मला समजून घ्या; पण समाजातील शिकवणीमुळे ते हा संदेश रागाच्या रूपात देतात. भावना व्यक्त करणं म्हणजे पुरुषत्व कमी होतं का? नाही! खरं तर भावना व्यक्त करणं हे परिपक्वतेचं चिन्ह आहे. जगभरातील संशोधन दाखवतं की, जे पुरुष आपल्या भावनांचा स्पष्ट आणि निरोगी पद्धतीने संवाद साधतात त्यामुळे ते अधिक आनंदी असतात, अधिक निरोगी असतात, नातेसंबंध अधिक मजबूत असतात, निर्णय अधिक स्पष्टपणे घेतात.
पुरुषांनी भावना व्यक्त करण्यासाठी काही सोपे मार्ग म्हणजे - 1) जवळच्या व्यक्तीशी बोलणे. पत्नी, मित्र, कुटुंब कोणाशीही. 2) भावना ओळखा- दु:ख, नाराजी, गोंधळ, ताण नेमकी भावना ओळखली की उपाय सापडतो. 3) छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आज ऑफिसमध्ये खूप ताण होता, एवढंही म्हटलं तरी पहिले पाऊल पडते. 4) गरज असल्यास तज्ज्ञाची मदत घ्या-कधी कधी काऊन्सिलिंग किंवा थेरपी मदतीचे ठरते. हे सामान्य आहे. त्यात काहीच शरमेची बाब नाही. 5) स्वतःसाठी वेळ द्या- वाचन, चालणे, संगीत, ध्यान-यामुळे मन मोकळं होतं.
पुरुषांवर इतकं दडपण टाकणं आरोग्यासाठी आणि नातेसंबंधांसाठी हानिकारक ठरतं. आपल्याला ‘रडू नकोस’ऐवजी ‘काय झालं, बोल ना’ म्हणायला हवं. मुलांना भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. पुरुषांचीसुद्धा भावनिक गरज असते, हे स्वीकारायला हवं. त्यांच्यासाठीही ‘safe space’ तयार करायला हवी. रडणे म्हणजे कमजोरी नव्हे. उलट ते शरीर आणि मन दोन्हीसाठी चांगले आहे. रडल्याने मन हलकं होतं, ताण दूर होतो, विचार स्पष्ट होतात, शरीरातील तणाव कमी होतो, कधी कधी दोन मिनिटं रडलं तरी मन शांत होतं आणि पुढची परिस्थिती नीट हाताळता येते. आज परिस्थिती हळूहळू बदलते आहे. मुलं-मुली समान असल्याची जाणीव पसरते आहे. मानसिक आरोग्याबद्दल अधिक चर्चा होते आहे. सोशल मीडियावर पुरुष आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू लागले आहेत. नव्या पिढीत पुरुष पित्यासारखे, पतीसारखे अधिक भावनिकपणे जोडले जातात. हा बदल समाजासाठी चांगला आहे. आजच्या काळातील बदल हे स्वागतार्ह आहेत.